पुनर्वसनासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती, मेट्रोच्या कामाचा त्रास गणेशोत्सवाला होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:08 AM2017-08-23T04:08:57+5:302017-08-23T04:09:24+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू असून, काळबादेवी-गिरगाव येथील प्रकल्पबाधितांचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू असून, काळबादेवी-गिरगाव येथील प्रकल्पबाधितांचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन करण्यात येणार आहे. येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जी.डी. सांभारे आणि आर.एच. माहिमतुरा या वास्तुविशारदांची नेमणूक केली असून, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे काम प्रत्यक्षात सहा महिन्यांनी सुरू होईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.
काळबादेवी-गिरगाव येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाबाबतची माहिती देण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीएच्या मुख्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अश्विनी भिडे बोलत होत्या.
जून २०१७ मध्ये वास्तुविशारदाच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कंत्राटामध्ये पुनर्वसन होऊ घातलेल्या इमारतीचे संरेखन, बांधकाम, देखरेख, व्यवस्थापन व नियोजनाचा सहभाग आहे. मेट्रो-३ च्या भूमिगत स्थानकांचे बांधकाम, प्रवेश-निकासद्वार, पूरक इमारती, वायुविजन स्तंभासारख्या कामांकरिता काळबादेवी-गिरगाव येथील सुमारे १९ इमारतींची जागा लागणार आहे. मेट्रोच्या कामामुळे इमारतीमधील २९३ निवासी आणि ३४१ व्यापारी गाळे तात्पुरते बाधित होणार आहेत.
महापालिका डीसीआर, १९९१, ३३(७) अन्वये बाधित इमारतीचे पुनर्वसन आणि पुनर्विकास मूळ ठिकाणीच करण्यात येणार आहे. सर्व प्रभावित इमारती या एकाच सर्वसमावेशक योजनेचा भाग समजून पुनर्विकास करण्यात येत आहे. इमारतींच्या पुनर्वसनाचे काम मेट्रो प्रकल्प सुरू असतानाच हाती घेण्यात येणार आहे. २०२१ पर्यंत संबंधित नागरिकांना पुनर्विकसित इमारती राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असेही भिडे यांनी सांगितले.
मेट्रोच्या कामाचा त्रास गणेशोत्सवाला होणार नाही
काळबादेवी-गिरगाव येथील गणेश मंडळांच्या मंडपांना मेट्रोच्या कामाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. येथील गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेड्स हलविण्याची व्यवस्था केली जाईल. काळबादेवी-गिरगावसह माहीम आणि दादर येथील गणेश मंडळाच्या मंडपांना मेट्रोच्या कामाचा त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.
एकंदर गणेशोत्सवात मेट्रोच्या कामाची काहीएक अडचण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले. धारावी येथे गणेश मंडळांना मंडपाबाबतची काहीही समस्या उद्भवलेली नाही. सांताक्रूझ येथे गणेश मंडळाच्या मंडपाची समस्या उद्भवली होती; मात्र ही समस्याही निकाली काढण्यात आली आहे, असेही भिडे यांनी सांगितले.
पुनर्वसनाचा आराखडा पूर्ण
प्रकल्पबाधितांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत पुनर्वसनाचा आराखडा पूर्ण करण्यात आला आहे. हे काम गतीने पुढे नेण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे. नमूद वेळेत प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केले जाईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन