Join us  

नव्या वर्षात महामंडळाची नियुक्ती, म्हाडासाठी जोरदार लॉबिंग; राऊतांना खुश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:55 AM

म्हाडाच्या सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग शिवसेनेत आहे. त्यामुळे घोसाळकर यांनी पुन्हा संधी मिळावी व मुदत वाढवावी म्हणून पक्षश्रेष्ठी शिवसेना नेत्यांना विनंती केली होती

अल्पेश करकरे

मुंबई - महाविकास आघाडी सरकार सत्तेत येवून आता बराच काळ लोटला असला तरीही महामंडळांच्या नियुक्त्यांचा प्रश्न अजूनही रखडलेला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महामंडळाचे अध्यक्षपद आपणास मिळेल ही भाबडी आशा बाळगून बसलेले छोटे-मोठे नेते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. मात्र अशातच आता या नव्या वर्षात, गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या म्हाडाच्या महामंडळावर सभापतीची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. म्हाडा हे महामंडळ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना आता कोणाला सभापतीपदी संधी देते आणि कोणाचा पत्ता कट करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनानंतर महामंडळाची नियुक्ती

राज्यातील महामंडळांची संख्या मोठी आहे. या महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट आणि राज्य मंत्रीपदाचा दर्जा असतो. त्यामुळे मंत्रीपद न मिळालेले आमदार आणि इतर कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी लॉबिंग करत असतात. सर्वच कार्यकर्त्यांना महामंडळ देणं शक्य नसल्याने अनेकांची नाराजीही ओढवली जाते. त्यातून पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या नेहमीच रखडवल्या जातात. मात्र आता अखेर दोन वर्षांनी या महामंडळाच्या नियुक्त या अधिवेशनानंतर करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत आहे

विनोद घोसाळकर यांचा पत्ता कट?

शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर हे म्हाडा सभापती पदासाठी इच्छुक आहेत व ते त्यासाठी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे प्रयत्नदेखील करत होते. मात्र विनोद घोसाळकर यांचा पत्ता कट होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. कारण घोसाळकर यांना गेल्या काही वर्षापासून हे सभापतीपद देण्यात आलं होतं .त्यामुळे पुन्हा घोसाळकर यांना हे देऊन इतर इच्छुक आणि शिवसेना उपनेते नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी म्हाडा सभापती पदापासून घोसाळकर यांना दूरच ठेवलं जाईल असं विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

म्हाडाच्या सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग शिवसेनेत आहे. त्यामुळे घोसाळकर यांनी पुन्हा संधी मिळावी व मुदत वाढवावी म्हणून पक्षश्रेष्ठी शिवसेना नेत्यांना विनंती केली होती. मात्र यावर विचार करू तसेच दुसऱ्या आपल्याच नेत्यांना देखील संधी मिळायला हवी असे घोसाळकर यांना सांगण्यात आले. त्यामुळे म्हाडा सभापती पदापासून विनोद घोसाळकर यांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता आहे.

यांना मिळू शकते संधी

महामंडळ नियुक्त्यांसाठी आधीच महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेकडे असलेल्या महामंडळ नियुक्ती यांसाठी पक्षांतर्गत देखील जोरदार लॉबिंग सुरू आहे. यामध्ये ज्या नेत्यांना विधानपरिषद न देता आली त्यांचा विचार याच्यासाठी करण्यात येणार आहे तसेच इतर उपनेते आहेत त्यांचं काम पाहून यंदा सभापतीची माळ अशा एका शिवसैनिकाच्या गळ्यात पडणार आहे अशी माहिती मिळत आहे.

म्हाडा सभापतीपदी शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून आलेले माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांची वर्णी लागू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जाते. तसेच शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ आणि अमोल कीर्तिकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे. तसेच म्हाडा अध्यक्ष पदासाठी सुनील राऊत यांचं नाव चर्चेत आहे.

टॅग्स :शिवसेनाम्हाडा