मुंबई : विद्युत सहायक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महावितरणकडून राज्यभरातील १ हजार १३ विद्युत सहायकांना गुरुवारी नियुक्ती पत्रे देण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात झालेल्या महासंकल्प कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणच्या १० विद्युत सहायकांना नियुक्तिपत्रे देऊन या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
महावितरणच्या विभागीय स्तरावर या विद्युत सहायकांची पदस्थापना करण्यात आली असून त्यांना तांत्रिक कामाचे प्रशिक्षणही देण्यात येईल. मुख्यालयापासून परिमंडल स्तरापर्यंत विद्युत सहायक या पदाच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहन करत सामाजिक बांधिलकी जपली आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सहकार्य करत शासनाचा महासंकल्प उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्याचे महावितरणने सांगितले.
कुठे किती नियुक्तिपत्रे
अकोला - ५७ , अमरावती - ३८, औरंगाबाद - ६२ , बारामती - १४३, भांडुप - ८३, चंद्रपूर - २२, गोंदिया - ९, जळगाव - १०३, कोल्हापूर - १०४, कल्याण - ७८, लातूर - ७०, नागपूर - ३७, नांदेड - ३९, नाशिक - ७६, पुणे - ६०, रत्नागिरी - ३२ एकूण - १ हजार १३ उमेदवार