मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईकाँग्रेस अध्यक्ष नियुक्तीला आता वेग आला आहे लवकरच नव्या अध्यक्षांची निवड जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप,माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी,माजी मंत्री नसीम खान, चरणजित सप्रा,मधू चव्हाण यांची नावे चर्चेत आहे. लोकमत ऑनलाईन व लोकमतमध्ये याबाबत सातत्याने सविस्तर वृत्त दिले होते.
मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर दि,2 व दि,3 रोजी मुंबईत आले होते.मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्धल मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. गेल्या ऑक्टोंबर तसेच दिवाळी नंतर दुसऱ्या दिवशी दि,17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता.
या तीन राउंड मध्ये त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार,माजी खासदार,माजी मंत्री,विद्यमान आमदार,विद्यमान मंत्री,विविध सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. आता 227 ब्लॉक अध्यक्षांना एसएमएस करून तुम्हाला एका नंबर वरून महत्वाचा कॉल येईल, त्याकडे लक्ष देऊन दिलेल्या सूचनांचे पालन करा असे एच.के.पाटील यांनी पाठविलेल्या एसएमएस मध्ये म्हंटले आहे. आतापर्यंत 227 पैकी अनेक ब्लॉक अध्यक्षांना एआयसीसी कडून फोन गेले असून अनेक ब्लॉक अध्यक्षांनी अमरजीत मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
मावळत्या वर्षात नव्या अध्यक्षांची निवड झाल्यास नव्या वर्षापासून आगामी 2022 च्या पालिका निवडणूकीची तयारी करायला अवधी मिळेल असे मत सूत्रांनी व्यक्त केले.