मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईकाँग्रेस अध्यक्ष नियुक्तीला आता वेग आला आहे लवकरच नव्या अध्यक्षांची निवड जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी आज दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्यात सुमारे दीड तास महत्वाची बैठक झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप,माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नावे शॉर्टलिस्ट झाली असून आजच्या बैठकीत या तिघांच्या नावावर सविस्तर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. लोकमत ऑनलाईन व लोकमतमध्ये याबाबत सातत्याने सविस्तर वृत्त दिले होते.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप,माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांमध्ये चूरस आहे. आजच्या बैठकीचा अहवाल कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर ठेवण्यात येणार असून मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय त्या घेणार आहेत.
मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर दि,2 व दि,3 डिसेंबर रोजी मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्धल मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. त्यापूर्वी गेल्या ऑक्टोंबर तसेच दिवाळी नंतर दुसऱ्या दिवशी दि,17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार,माजी खासदार,माजी मंत्री,विद्यमान आमदार,विद्यमान मंत्री,विविध सेलचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. ओपिनियन पोल द्वारे त्यांनी 227 ब्लॉक अध्यक्ष व विभागीय पदाधिकारी अश्या एकूण 550 जणांची त्यांनी मोबाईलवर चर्चा करून त्यांची मते देखिल अजमावली होती. या सर्व मान्यवरांनी डॉ. मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.