विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुखपदी नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती, सहकार्याबद्दल मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 07:16 PM2017-09-11T19:16:48+5:302017-09-11T19:17:47+5:30
विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख म्हणून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली आहे. विधीमंडळाच्यावतीने नुकत्याच विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
मुंबई, दि. 11 - विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख म्हणून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती झाली आहे. विधीमंडळाच्यावतीने नुकत्याच विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
आ. डॉ. गोऱ्हे यांनी मागील १५ वर्षे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार व्यक्त केले. याचसोबत विधीमंडळात कामकाज करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिवसेनेचे गटनेते व सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू या सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत.
आ. डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीवर सन २०१५ पासून समितीप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. या काळात डॉ. गोऱ्हे यांनी विधीमंडळाचे सदस्य यांचे विशेषाधिकार व हक्क आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी ठाणे, सांगली, औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी याबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचा प्रतिसाद दिला होता.
‘विधानमंडळाचे विशेषाधिकार व राजशिष्टाचार’ याबाबत माहिती देणारी एक विशेष माहिती पुस्तिकाही आ. डॉ. गोऱ्हे यांनी समितीच्या माध्यमातून प्रकाशित केली आहे. समितीच्या समोर आलेल्या अनेक हक्कभंग प्रकरणांचा यशस्वी पाठपुरावा व योग्य ते निर्णय आ. डॉ. गोऱ्हे यांनी घेतले आहेत. या व्यतिरिक्त आ. डॉ. गोऱ्हे या विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समिती, अंदाज समिती, ग्रंथालय समिती, आणि अशासकीय विधेयक व ठराव समितीच्या सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
शिवसेना सदस्यांच्या विधानपरिषदेच्या समित्यांवर सदस्यपदी करण्यात आलेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे :-
- अनिल परब : कामकाज सल्लागार समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य अनुपस्थिती समिती, नियम समिती, अशासकीय विधेयक व ठराव समिती, सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणे समिती.
- तानाजी सावंत : पंचायत राज समिती, विनंती अर्ज समिती, आहार व्यवस्था समिती.
- रवींद्र फाटक : उपविधान समिती, विशेष हक्क समिती, सदस्य अनुपस्थिती समिती.
- गोपीकिशन बाजोरिया : आश्वासन समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती, आमदार निवास व्यवस्था समिती, माजी सदस्यांचे निवृत्ती वेतन समिती.
शिवसेना सदस्यांच्या विधानसभेच्या समित्यांवर सदस्यपदी झालेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे :-
- अनिल कदम – अंदाज समिती प्रमुख.
- विजयराज औटी – उपविधान समिती प्रमुख.
- सुभाष साबणे – इतर मागासवर्गीय कल्याण समिती प्रमुख.
- जयप्रकाश मुंदडा - आश्वासन समिती.
- राजन साळवी - अशासकीय विधेयके व ठराव समिती.