मुंबई : पालिकेच्या विभागातील वॉर रूममधून पाठवलेल्या कोविड रुग्णांनाच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा नियम आहे. मात्र याबाबत वारंवार सूचना करूनही अनेक ठिकाणी परस्पर रुग्ण दाखल केले जात आहेत. याची गंभीर दखल घेत नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसेच सर्व रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.पालिकेच्या नियमानुसार लक्षण नसलेले किंवा सामन्य लक्षण असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. तसेच खासगी रुग्णालयातील खाटांचे नियोजन पालिकेच्या वॉर्ड वॉर रूममार्फतच केले जाईल, असे पालिकेने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. तरीही पालिकेला न कळवता काही मोठ्या रुग्णालयांमध्ये परस्पर रुग्ण दाखल करून घेत आहेत. यामुळे पालिकेने रुग्ण पाठविल्यानंतर त्या रुग्णालयात रुग्ण आधीच दाखल असल्याचे दिसून आले आहे.याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व रुग्णालयांना पालिकेने नोटीस पाठवली आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे नियोजन पालिकेच्या वॉर रूममार्फत करण्यात येणार आहे, अशा स्पष्ट सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे खाटांचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयनिहाय नोडल आॅफिसरची नियुक्ती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
खाटांच्या नियोजनासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती; पालिका प्रशासनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 1:15 AM