Join us

Kamala Building Fire: ताडदेव येथील इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी समितीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 8:45 PM

Fire Kamala Building Tardeo Mumbai : ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत शनिवारी लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्र कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई - ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत शनिवारी लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्र कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त (परिमंडळ दोन) हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. पुढील १५ दिवसांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. 

भाटिया रुग्णालयासमोरील सचिनाम (कमला) या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सहा रहिवासी मृत्युमुखी पडले तर २३ जण जखमी आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्याअंतर्गत इमारतीचे मालक व पदाधिकाऱ्यांना अग्निरोधक यंत्र कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या इमारतीमध्ये बसवण्यात आलेले अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरली. यामुळे आगीचा धोका वाढला.

प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी उपायुक्त (परिमंडळ दोन) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी डी.के. घोष, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), आणि उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव, शहर) यांचा समावेश असणार आहे.

या प्रमुख बाबींची चौकशी होणार....- प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांची चर्चा करून आगीचे नेमके कारण शोधून काढणे.

- सहा रहिवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आगीचा प्रसार वाढण्याचे कारण शोधणे.

- पालिकेने मंजूर केलेल्या आराखडा व्यतिरिक्त इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम अथवा अनाधिकृत बांधकाम केले आहे का?

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदतया आधीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सहा रहिवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारमार्फत दिली जाणार आहे. तर जखमींना ५० हजार रुपये व पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातील, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

अजून किती निष्पाप मृत्यू हवे... या आगीच्या दुर्घटनेला महापालिका जबाबदार आहे. असे किती निष्पाप मृत्यू महापालिकेला हवे आहेत. सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे ? महपालिका, पोलिस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

टॅग्स :मुंबईआग