मुंबई : गोरेगाव - मुलुंड लिंक रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या ट्वीन टनेलसाठी आणि कोस्टल रोडच्या वर्सेावा ते दहिसर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई महापालिका प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार आहे. फिल्म सिटी ते मुलुंड खिंडीपाडादरम्यान हे ट्विन टनेल बांधले जाणार आहेत. कोस्टल रोडच्या वर्सोवा ते दहीसर टप्प्यातील पॅकेज सी आणि पॅकेज डी साठी पालिकेकडून प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि वेळेत पूर्ण व्हावी या उद्देशाने या प्रकल्प सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या दोन्ही भुयारी मार्गांची लांबी साधारण ४.७० किलोमीटर असेल. गोरेगाव फिल्म सिटी ते मुलुंड खिंडीपाडा यादरम्यान हे ट्विन टनेल बांधले जाणार आहेत. हे जुळे बोगदे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) च्या माध्यमातून खणले जाणार आहेत, अत्याधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान यांचा समावेश या टप्प्याच्या कामात असणार आहे. या सगळ्या गोष्टीवर एकाचवेळी लक्ष देऊन वेळोवेळी कामाच्या विकासाची नोंद घेणे, नियंत्रण ठेवणे, आवश्यकता असेल तेथे बदल करून योग्य पर्याय सुचविणे, कामाचा दर्जा राखणे या सर्व कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे झाले आहे.
वर्सोवा ते दहीसर टप्प्यातील पॅकेजेस :
पॅकेज ए : वर्सोवा ते बांगूरनगर, गोरेगाव ४.५ किमी
पॅकेज बी : बांगूरनगर ते माइंडस्पेस, मालाड १.६६ किमी
पॅकेज सी आणि डी : उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा सर्व्हिस रोड, मालाड माइंडस्पेस ते चारकोप कांदिवली ३.६६ किमी
पॅकेज ई : चारकोप ते गोराई ३.७८ किमी
पॅकेज एफ : गोराई ते दहीसर ३.६९ किमी
पॅकेज सी आणि डीसाठी सल्लागार :
वर्सोवा ते दहीसर सागरी किनारा मार्गासाठीची पालिकेची तयारी सुरू आहे. हा मार्ग पुढे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालाही जोडण्यात येणार आहे. यात एकूण ६ पॅकेज असून, पॅकेज सी मध्ये माइंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा आणि पॅकेज डीमध्ये चारकोप ते माइंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगद्याच्या समावेश आहे.