Join us

भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी रवनीत सिंग यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

मुंबई : भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी व्हाइस ॲडमिरल रवनीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल ...

मुंबई : भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी व्हाइस ॲडमिरल रवनीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल एम.एस.पवार यांच्याकडून रवनीत सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

अतिविशिष्ट सेवा पदक, नौसेना पदकाने सन्मानित असलेले व्हाइस ॲडमिरल रवनीत सिंग १ जुलै १९८३ साली भारतीय नौदलात सामील झाले. एव्हिएशन तज्ज्ञ असणाऱ्या सिंग यांचा उच्च दर्जाचे विमान उड्डाण प्रशिक्षकांमध्ये समावेश आहे. आपल्या कारकिर्दीत एचटी-२, किरण एचजेटी१६, टीएस ११, हंटर, हॅरिअर, जेट, चेतक, हाॅक, मिग २९ अशी अनेक विमाने, हेलिकाॅप्टर्स चालवली आहेत.

रवनीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यात राजनैतिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या. २००५ ते २००८ या कालावधीत केनिया,टांझानिया आणि सिलचरसाठी भारतीय संरक्षण सल्लागार म्हणून काम पाहिले होते. ध्वजाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर युद्धनौका खरेदी आणि संपादन सहाय्यक नियंत्रक पद सांभाळले. याशिवाय, पश्चिम विभागाच्या ताफ्याचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.