सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्त्या पुढील शैक्षणिक वर्षात राहणार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:07 AM2021-02-25T04:07:27+5:302021-02-25T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विहित प्रक्रिया पूर्ण करून घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) नियुक्त करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विहित प्रक्रिया पूर्ण करून घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) नियुक्त करण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या सेवा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सुरू ठेवण्याकरिता योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कोरोना काळात सीएचबीवरील प्राध्यापकांसमोर बिकट झालेल्या आर्थिक प्रश्नातून थोडा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करत आहेत.
गेल्या दशक-दोन दशकांत महाविद्यालयांची संख्याही वाढली. नियमित प्राध्यापक निवृत्त होत गेले. पण, त्यांच्या ठिकाणी नव्याने नियुक्ती करताना शासनाकडून डोळेझाक झाली. त्यामुळे तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती हाच एक पर्याय राहिला आणि यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जरूर टळले आहे. पण, त्यांची बौद्धिक भूक भागविण्याऱ्या सीएचबी'वरील प्राध्यापकांना तुटपुंजे मानधन देऊन अर्धपोटी ठेवले जाते. अन्य काही पर्याय नसल्याने त्यांना अपुऱ्या मानधनावरच समाधान मानावे लागत आहे. कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. शिक्षण क्षेत्रही यातून सुटलेले नाही. विशेषत: तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची मोठी अडचण झाली आहे. दरवर्षी महाविद्यालयांचे कामकाज सुरू होऊन सीएचबीवरील प्राध्यापकांना नियुक्तीही मिळत होती. त्यामुळे थोडा विलंब असेना का; पण मानधनाची शाश्वती मिळत होती. मात्र, यंदा नवीन नियुक्त्यांचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे मानधन तर खूप दूरची गोष्ट झाली होती.
यापूर्वी सीएचबीवरील प्राध्यापकांची महाविद्यालयांकडूनच नियुक्ती केली जात होती. गेल्या वर्षी त्यात बदल करण्यात आला. महाविद्यालयाने विद्यापीठाला प्रस्ताव पाठविल्यावर विद्यापीठ सहसंचालक कार्यालयाकडून मंजुरी घेत आहे. पण, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाने सीएचबीवरील प्राध्यापकांची परिस्थिती आणखी बिकट केली. कोरोनाची परिस्थिती पाहता गेल्या वर्षीच्या प्राध्यापकांनाच यंदा कायम करावे, अशी मागणी होत आहे. पण, अद्याप नियुक्त्याच मिळालेल्या नाहीत. नियुक्तीच नाही तर मानधन कसे मिळणार? फेब्रुवारीत शेवटचे मानधन मिळाले आहे. पाच महिन्यांपासून मानधन नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट बनली. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अखेर निर्देश आले...
कोरोनामुळे महाविद्यालयांचे कामकाज कोरोना काळात बंदच आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण दिले जाते. महाविद्यालये कधी सुरू होतील, हे सध्या तरी सांगता येत नाही. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणामुळे पूर्णवेळ प्राध्यापक सध्या अर्धवेळ काम करीत आहेत. मग तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. गेल्या वर्षीच्या सीएचबीवरील प्राध्यापकांनाच यंदा कायम करावे, अशी मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेमुळे सीएचबी प्राध्यापकांना थोडा तरी दिलासा मिळणार आहे.