मुंबई - अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत, परंतु जेव्हा ती मुले १८ वर्षानंतर अनाथालयातून बाहेर येतात तेव्हा त्यांच्या समोर पुढील आयुष्याचे प्रश्नचिन्ह असते त्यासाठी त्यांना पाठिंबा देणारी कुठलीही संस्था नाही. अशा अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी तर्पण फाउंडेशन ही संस्था मागील चार वर्षांपासून कार्यरत आहे. या अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च, नोकरी, त्यांची राहण्याची व्यवस्था, वेळोवेळी चांगले संस्कार देण्याची व्यवस्था तर्पण फाउंडेशनतर्फे केली जाते.तपर्ण संस्थेने १२६१ मुले दत्तक घेतली असून या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांवर रिसर्च करण्यासाठी तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडेमी सुरु करण्यात आलेली आहे. या रिसर्च सेंटरचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारच्या माध्यमातून अनाथ मुलांना १ टक्का आरक्षण आपण दिलेले आहे आणि आता तर्पण तर्फे जे रिसर्च फाउंडेशन सुरु झालेले आहे, हे अनाथ मुलांसाठी काम करणारे हे जे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मूलभूत रिसर्च या फाउंडेशनच्या माध्यमातून होईल आणि त्यातून या क्षेत्रामध्ये नवीन धोरणे तयार करण्याकरिता व अनाथांच्या क्षेत्राला नवीन दिशा देण्याकरिता एक महत्वाचे कार्य याच्या माध्यमातून होणार आहे.
यावेळेस बोलताना तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय म्हणाले की, बालगृहातून बाहेर पडलेल्या अनाथ मुलांसाठी, त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांनी आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची एक सामर्थ्यवान शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी काम करणारी तर्पण फाऊंडेशन एक एनजीओ आहे. आम्ही मागील चार वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहोत.१८ वर्षानंतर अनाथ मुलांना बालगृह सोडावे लागते. मागील चार वर्षांपासून आम्ही १८ वर्षानंतर अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी काम करतो. आम्ही १२६१ मुले दत्तक घेतली आहेत. आम्ही या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, नोकरी, राहण्याची आणि वेळोवेळी या मुलांच्या संस्काराची देखील व्यवस्था केली आहे.