आयुक्त आले; ‘त्यांच्या’सोबत फराळ करून कौतुक केले; पहिल्यांदाच स्वच्छता कर्मचारी वसाहतीत आयुक्तांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 12:49 PM2024-11-02T12:49:50+5:302024-11-02T12:50:07+5:30

आयुक्तांनी वसाहतीतील स्वच्छतागृहांची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेच्या काय उपाययोजना आहेत, याबाबत रहिवाशांकडे विचारपूसही केली.

Appreciated by snacking with 'them'; Commissioner's Diwali for the first time in sanitation workers colony | आयुक्त आले; ‘त्यांच्या’सोबत फराळ करून कौतुक केले; पहिल्यांदाच स्वच्छता कर्मचारी वसाहतीत आयुक्तांची दिवाळी

आयुक्त आले; ‘त्यांच्या’सोबत फराळ करून कौतुक केले; पहिल्यांदाच स्वच्छता कर्मचारी वसाहतीत आयुक्तांची दिवाळी

मुंबई : कासारवाडी (दादर) परिसरातील स्वच्छता कामगारांसाठी शुक्रवारची सकाळ एका विशेष भेटीमुळे आनंद, उत्साहाची ठरली. पालिका इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांनी सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली. 

स्वच्छता कर्मचाऱ्यांची तिसरी-चौथी पिढी कासारवाडीत वास्तव्यास आहे. या कामगारांच्या वसाहतीला आयुक्त भूषण गगराणी यांच्या रूपाने भेटीसाठी पहिल्यांदाच पालिका आयुक्त सपत्नीक आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत फराळही केला. यावेळी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता, कर्मचारी वर्गही उपस्थित होता.

आयुक्तांनी वसाहतीतील स्वच्छतागृहांची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेच्या काय उपाययोजना आहेत, याबाबत रहिवाशांकडे विचारपूसही केली. तसेच परिसर स्वच्छतेसाठी पुरविण्यात येणाऱ्या साहित्यांचा, उपकरणांचा पुरवठा आणि व्यवस्थेबाबतही त्यांनी कामगारांसोबत संवाद साधला. 

आमच्या अनेक पिढ्या येथे राहिल्या...
 - जी उत्तर विभागात माहीम दर्गा येथे चौकीसाठी काम करणाऱ्या रिद्दी गोहील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गगराणी दाम्पत्याला दिवाळी फराळ आणि चहा दिला. 
- आमच्या अनेक पिढ्या या वसाहतीत राहिल्या आहेत. पालिकेने या वसाहतींसाठी केलेली व्यवस्था आणि स्वच्छतेची घेतलेली काळजी ही कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया गोहील कुटुंबीयांनी दिली. 
- पालिकेच्या टी विभागातील मुलुंड पश्चिम येथे राजेंद्र प्रसाद मार्ग स्वच्छता कर्मचारी वसाहतीलाही आयुक्तांनी भेट दिली.

समस्या सोडविण्यास पालिका कटिबद्ध 
गेल्याच आठवड्यात गगराणी यांनी सफाई कामगारांशी संवाद साधला होता. यावेळी आयुक्तांनी कामगारांच्या कामाचे कौतुक केले होते. तसेच स्वच्छता करताना मास्क, हातमोजे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, गम बूट, आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे, असेही आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले होते. कोणतीही वारसाहक्क, अनुकंपा प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, या अनुषंगाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश गगराणी यांनी दिले होते.

Web Title: Appreciated by snacking with 'them'; Commissioner's Diwali for the first time in sanitation workers colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई