मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, आताच्या काळात भाजपाशिवाय पर्याय नाही. आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे, आर्टिकल 370 सारखी कलम हटवण्याचं महत्त्वाचं काम केंद्रातील भाजपा सरकारनं केलं आहे. मी इंदापूरच्या सभेत सर्वकाही बोललोय. त्यामुळे इथं जास्त काहीही बोलणार नाही. आम्ही 1952 सालापासून एकाच विचारात वाढलेलो आहोत. आमची चौथी पिढी राजकारणात आहोत. सध्याच्या काळात भाजपाशिवाय पर्याय नाही, असं आम्हाला वाटतंय. मी कुठलिही अट न घालता भाजपात प्रवेश केला आहे, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.
केंद्रातील मोदी सरकारचे नुकतेच 100 दिवस झाले आहेत. या 100 दिवसांत मोदी सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, कलम 370 हटविण्याचा निर्णय असेल किंवा मोटार वाहन नियमातील बदलाचा निर्णय हा धाडसी पाऊल असल्याचं पाटील म्हणाले. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते असलो, तरी सभागृहात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्र्यांचा चेहरा नेहमीच हसरा राहिला आहे, आता हर्षवर्धन आल्याने त्यांचा चेहरा अधिक हसरा होईल. पक्षाची कुठलिही जबाबदारी मी पार पाडेन आणि भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवेल. भाजपा आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राला न्याय देतील. आपण काहीही केलं तरी आपला शेजार बदलू शकत नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी आता आमच्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती.