Join us

अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध खात्यांचे कर्मचारी कार्यरत, निधी चौधरी यांच्याकडून कौतुक

By मनोहर कुंभेजकर | Published: October 23, 2022 9:25 PM

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि,३ नोव्हेंबर  रोजी होणार असून दि,६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

मुंबई : "आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी" या कवि - संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या समर्पक शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दिवाळीला "सणांचा राजा" असंही म्हटलं जातं. याच दिवाळीनिमित्त अनेक मुंबईकर आपापल्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतात. तर अनेक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. मात्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व विधानसभा' मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी अनेक याला अपवाद ठरले आहेत. निवडणूक कर्तव्यर्थ कार्यरत असणाऱ्यांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी हे यंदाच्या दिवाळीतील सर्व दिवशी निवडणूक कर्तव्यासाठी समर्पित भावनेने काम करणार असल्याची माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि,३ नोव्हेंबर  रोजी होणार असून दि,६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आधी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हर' यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.

निवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, म्हाडा, महावितरण, कामगार आयुक्तालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाचे विविध विभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्र, असे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी हे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय करणार आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपनगर जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी कौतुक केले आहे. तसेच येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघात सुटी घोषित करण्यात आली आहे. मात्र, ती सुट्टी हे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे; हे लक्षात घेऊन सर्व संबंधित मतदारांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.