कोरोना काळात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:30+5:302021-04-04T04:06:30+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. या काळामध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. या काळामध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. या काळामध्ये रेल्वेने विशेष सेवा म्हणून अनेक फेऱ्या चालविल्या. ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी देखील रेल्वे सेवा सुरू होती. लॉकडाऊनमध्येच गेल्या वर्षभरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशभरातल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
याबाबत गोयल यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच रेल्वेने लॉकडाऊन असतानाही दिलेल्या सेवेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. या पत्रात पीयूष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. कोरोनाच्या काळात आपल्या रेल्वेनं देशाच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिलं. जेव्हा सारं जग थांबलं होतं, तेव्हा तुम्ही एकही दिवसाची सुटी न घेता अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी अतिजोखमीच्या वातावरणात काम करत राहिलात. तुमच्यामुळेच आपण कोरोना काळातही देशभरात जीवनावश्यक गोष्टींचा अविरत पुरवठा करू शकलो, असे गोयल यांनी या पत्रात नमूद केले आहे.