‘ऑनलाइन’ अभिवादनाच्या आवाहनाला कौतुकास्पद प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:07 AM2020-12-06T04:07:00+5:302020-12-06T04:07:00+5:30
महापरिनिर्वाण दिन : यंदा चैत्यभूमीवर गर्दी नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...
महापरिनिर्वाण दिन : यंदा चैत्यभूमीवर गर्दी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. यंदा खबरदारीची योजना म्हणून कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन पालिकेने केले. या आवाहनाला अनुयायांनी सहकार्य केल्याचे दिसून येत असून, चैत्यभूमीवर नागरिक आले नसल्याचे पाहावयास मिळाले. हा प्रतिसाद कौतुकास्पद आहे.
कोरोनामुळे एकत्र येण्यावर असलेल्या मर्यादा पाहता अनुयायांनी यंदा चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यास अनुयायांनी प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रांग असते. यंदा तशी रांग आणि जनसागर दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबर रोजी अपेक्षित आहे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशन सदराखाली ई-पुस्तके विभागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिका २०२० या नावाने उपलब्ध आहे.
प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येताही अनुयायांना अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे
पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून करण्यात येणार आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे चैत्यभूमी हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आपण सर्व सहकार्याने प्रयत्न करत आहोत.
* चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण
चैत्यभूमीवरील थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाइन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत.
यूट्युब: bit.ly/abhivadan2020yt /
फेसबुक: bit.ly/abhivadan2020fb /
ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt