विद्याधर दाते
आरे वसाहतीतील शेकडो झाडे तोडण्यापेक्षा मोठे संकट मुंबईकारांपुढे उभे राहणार आहे आणि त्याचा मेट्रो रेल्वेशी जवळचा संबंध आहे. त्याकडे फार कमी लक्ष गेले आहे. ते म्हणजे नवीन येणारे धोरण की बेस्ट बसेस फक्त रेल्वे आणि मेट्रो स्टेशन्सपर्यंतच धावतील. नवीन आयुक्त प्रवीण परदेशी हे जाणकार आहेत. त्यांनी बस भाडे पाच रुपयांपर्यंत कमी करून व बसेसची संख्या वाढविण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे फार फायदा झाला आहे, पण येऊ पाहणाऱ्या धोरणामुळे मुंबईकरांची चांगलीच कोंडी होणार आणि वाहनकोंडीही प्रचंड वाढेल. कारण बसेसची जागा मोटर गाड्या घेतील.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या वर्षी जाहीर केले की, आम्ही ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या पद्धतीप्रमाणे शहरी वाहतूक पद्धत अंमलात आणू. ट्रान्सपोर्ट फॉर लंडन या संस्थेशी या बाबतीतील करारदेखील करण्यात आला आहे. म्हणजे सार्वजनिक वाहतुकीला, बसेसना प्राधान्य देऊ. मुंबईच्या नवीन धोरणामुळे नेमके लंडन मॉडेलच्या विरोधी प्रकार होईल.
मागच्या महिन्यात मी नऊ दिवस लंडनभर पायी, बसेसने व जमिनीखालच्या ट्यूब रेल्वेने भरपूर प्रवास केला. मुंबईपेक्षा लंडनमध्ये ट्यूबचे जाळे खूप मोठे असूनही बसचे जाळे आणखीन विस्तारत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जागतिक आर्थिक केंद्र व खूप संपन्नता असूनही त्यांनी बसेसना खूप महत्त्व दिले आहे व मोटारींची संख्या खूप कमी केली आहे. या उपायांमुळे कुठेही वाहतूककोंडी दिसली नाहीत. बिलकूल उड्डाण पूल नाहीत. शहराच्या एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत बसने जाता येते, अगदी आरामात. सुंदर डबल डेकर बसेसमध्ये, मला केव्हाही फार गर्दी जाणवली नाही. पूर्ण रात्रभर बसेस धावतात.
बसेसमध्ये मला केव्हाही फार गर्दी जाणवली नाही. बºयाच बसेस रिकाम्याच दिसल्या व त्यातून नफा मिळविणे ही दृष्टी बिलकूल दिसली नाही. महत्त्वाचा मुद्दा असा की, मेट्रो हा बसला मुळीच पर्याय होऊ शकत नाही आणि मेट्रोमुळे वाहतूककोंडी कमी होईल, ही अपेक्षा फार करू नये. दिल्लीमध्ये मेट्रोचे जाळे पुष्कळ असूनही वाहतूककोंडी दिवसेंदिवस प्रचंड वाढते आहे. कारण त्यांनी बस वाहतुकीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे जगातील सर्वात प्रदूषणयुक्त शहर ते आहे. यापासून आम्ही काही धडा घेणार आहोत की नाही?
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी एक दिवस सम अंकी नंबर प्लेट असलेलेच वाहन रस्त्यावर असेल व एक दिवस विषम अंकी नंबर प्लेट असलेले वाहन रस्त्यावर धावते़ असे उपाय करूनही तेथील प्रदूषण काही कमी होत नाही़ असा पर्याय मुंबईतही करण्याचा विचार होता़ मात्र, त्याला तूर्त तरी शक्य झाला नाही़
अमिताभ बच्चन यांना जाहिरातीत वापरून असे चित्र निर्माण केले जात आहे की, मुंबईचे वाहतुकीचे प्रश्न मेट्रोमुळे चुटकीसारखे सुटतील, हे अत्यंत घातक आहे. कारण मोटारींची संख्या खूप कमी करणे व बसेसची संख्या खूप वाढविणे हे आवश्यक आहे. ते न केल्यास वाहतूककोंडी वाढेल, शिवाय आपली मेट्रो स्टेशन्स त्या मानाने खूप कमी लांब लांब आहेत. बसचा सोपा उपाय, जिथे सहज उपलब्ध आहे, तिथे लोकांना मेट्रोमध्ये गुरांसारखे जायला लावून द्राविडी प्राणायाम कशाकरिता करायचा? बस प्रवासात जी लवचिकता आहे, ती मेट्रोमध्ये कधीच येऊ शकत नाही. लंडन असो की मुंबई, शिवाय मेट्रोमध्ये प्रचंड चालावे लागते. प्रचंड लिफ्ट्सने वर-खाली करावे लागते.
बसेसबद्दल आमच्या राज्यकर्त्यांचा व अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. लंडनला अगदी बकिंगहॅम राजवाड्याजवळ शहराच्या मध्यात खूप मोठा व्हिक्टोरिया बस डेपो आहे. बाहेरगावच्या गाड्या तिथे ये-जा करतात. बसेस हा वाहतुकीला अडसर आह़े़ अशी अतिशय मूर्खपणाची कल्पना आमच्या राज्यकर्त्यांची आहे. मुंबईसारख्या शहरात गेल्या पन्नास वर्षांत एक चांगला लांब पल्ल्याचा बसेसचा डेपो असू नये, ही किती लाजिरवाणी बाब आहे, शिवाय विमानतळापासून शहरात यायला बससेवा नाही. बससेवा कमी करणे म्हणजे वाहतूककोंडीमध्ये भर टाकणे होईल.
बरेचसे वरच्या थरातले पर्यावरणवादी चांगले काम करत आहेत, पण ते मोटरवाले आहेत व बससेवेबद्दल, सार्वजनिक वाहतुकीबद्दल त्यांना पुरेशी माहिती नाही, आपुलकी नाही. त्यामुळे व सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साधे प्रश्न उगाच कठीण बनले आहेत. ते सोडविणे कठीण नाही, पण राज्यकर्त्यांना साधे उपाय नको आहेत. त्यांना खूप खर्चिक, लोकांना भूल देणारे प्रकल्प हवे आहेत.(लेखक वाहतूक अभ्यासक आहेत)