Join us

टेंबा रुग्णालयासाठी अशासकीय देणगी स्वीकारण्यास मान्यता

By admin | Published: July 04, 2015 11:17 PM

पालिकेच्या टेंबा रुग्णालयाला आर्थिक टेकू देण्यासाठी १ जुलैच्या महासभेत अशासकीय देणग्या स्वीकारण्याच्या धोरणाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत

भार्इंदर : पालिकेच्या टेंबा रुग्णालयाला आर्थिक टेकू देण्यासाठी १ जुलैच्या महासभेत अशासकीय देणग्या स्वीकारण्याच्या धोरणाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत रखडलेले हे रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेने १६ एप्रिल २००७ च्या महासभेतील ठरावानुसार भार्इंदर पश्चिमेस सुमारे २०० खाटांचे चार मजली टेंबा सर्वसाधारण रुग्णालय २०१२ मध्ये बांधले. ते चालविणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासन अथवा सेवाभावी किंवा धर्मादाय संस्थेमार्फत ते चालविण्याचा प्रस्ताव १४ डिसेंबर २०१२ च्या महासभेने मंजूर केला होता. मात्र, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात २००६ मध्ये दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत हे रुग्णालय पालिकेनेच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतरही पालिकेने २०१२ मधील मंजूर ठरावानुसार रुग्णालय हस्तांतरणाच्या परवानगीसाठी ६ मार्च २०१३ रोजी न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यावर, २८ मार्च २०१४ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने तो अर्ज फेटाळून महापालिकेलाच ते सुरू करण्याचा आदेश दिला. याविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तेथेही उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, ते टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने उच्च न्यायालयात सादर केले होते. परंतु, आर्थिक अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने अंदाजपत्रकातील तरतुदीखेरीज ते सुरू करण्यासाठी अशासकीय देणग्यांतून निधी जमविण्याचा प्रस्ताव २ मार्च २०१५ च्या महासभेत सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे धोरण निश्चित करण्याच्या प्रस्तावास १ जुलै १५ च्या महासभेनेसुद्धा बहुमताने मान्यता दिल्याने आर्थिक पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.