बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता; लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 06:34 PM2020-06-30T18:34:30+5:302020-06-30T18:34:55+5:30
बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई : बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेवर १५ जून पासून निवडक अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आल्या. पोलीस, पालिका, खासगी व सरकारी रुग्णालय कर्मचारी, मंत्रालय या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी परवानगी दिली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच बँक कर्मचारी, विविध वीज कंपन्या यांच्याकडून रेल्वेकडे प्रवासाची परवानगी मागितली. परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडूनच निर्णय होत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर केंद्राने राज्य सरकारला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची परवानगी देण्याची विनंती केली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या मुंबई उपनगरी रेल्वे सेवेत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा देण्यावरुन नुकताच राज्य सरकार व रेल्वे प्रशासनात चर्चा झाली. राज्य सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची आकडेवारी मिळाल्यावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ई-पास, क्यू आर कोडचे पास उपलब्ध करण्याची मागणी रेल्वेने राज्य सरकारकडे केली.
---------------------
लोकल प्रवास करण्यास मान्यता
बँक कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उद्यापासून त्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आकडेवारी राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यानुसार लोकल फेऱ्यामध्ये वाढ केली जाणार आहे.
- शलभ गोयल, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे