सहा गावांच्या विकास आराखड्यास मंजुरी
By Admin | Published: June 10, 2015 10:43 PM2015-06-10T22:43:26+5:302015-06-10T22:43:26+5:30
खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा गावांचा कायापालट होणार असून या गावांच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरावरुन मान्यता
पालघर : खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा गावांचा कायापालट होणार असून या गावांच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरावरुन मान्यता देण्यात आली असून खासदारांनीही याला हिरवा कंदील दाखविला आहे.
खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत धानोशी (जव्हार), उमरोळी (पालघर), चारोटी (डहाणू), गोऱ्हे (वाडा), हमरापूर (वाडा), धाकटी डहाणू (डहाणू) या गावांची निवड करण्यात आली. निवडलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास योजना आखण्यात आली आहे. शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, उपजीवीका आदी विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक विकासाला केंद्रबिंदू मानून उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. यामध्ये केवळ साधनसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला नसून जास्तीत जास्त नागरिकांचे जीवनमान कसे उंचवता येईल, याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सांगितले. योजना राबविताना ग्रामसभांना सक्रीय करण्यात येणार असून ग्रामपंचायतीना सशक्त व पारदर्शी बनविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)