Join us

पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला मान्यता; मालाडवासियांना नवीन वर्षाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 2:32 PM

मालाड पूर्व वासीयांच्या अनेक वर्षांच्या या वॉर्ड विभाजनाच्या मागणीला अनेक वर्षांनी यश आले आहे.

मुंबई: पालिकेच्या पी उत्तर वॉर्डच्या विभाजनाला राज्य सरकारने मान्यता दिली असून आता पी पूर्व हा नवा वॉर्ड अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे सघ्याच्या पालिकेच्या वॉर्डची सध्या असलेली संख्या आता 25 होणार आहे.

मालाड पूर्व वासीयांच्या अनेक वर्षांच्या या वॉर्ड विभाजनाच्या मागणीला अनेक वर्षांनी यश आले आहे. मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. 

सद्यस्थितीतील पी/उत्तर विभागाचे विभाजन करून मालाड पूर्व वासियांकरिता "पी/पूर्व" नावाने नवीन प्रशासकीय वॉर्ड लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नव्या प्रशासकीय वॉर्डच्या कार्यालयाकरिता आवश्यक असलेली जागा सुद्धा मालाड पश्चिम दुर्तगती महामार्गाजवळ महानगरपालिकेकडून आरक्षित करण्यात आली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रभागनिहाय लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती पाहता व  सर्वाधिक लोकसंख्या पी उत्तर या प्रभागात होती, ज्यात मालाड पूर्व, मालाड पश्चिम या परिसरातील तब्बल 17 वॉर्ड चा समावेश होता. या वॉर्ड मध्ये मालाड पश्चिम, दिंडोशी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचा काही भाग येतो. मालाड पश्चिम लिबर्टी गार्डन जवळ असलेल्या पी उत्तर वॉर्ड कार्यालयात महानगरपालिकेच्या संदर्भातील दैनंदिन कामे करण्याकरिता मालाडच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. 

मागील अनेक वर्षांपासून मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती.  स्थानिकांकडून होणाऱ्या मागणीच्या पूर्ततेकरिता आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले. या निर्णयामुळे मालाडवासीयांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका