जुलूसकरिता दोन कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 09:32 PM2019-11-07T21:32:22+5:302019-11-07T21:32:39+5:30
जयंतीदिनी ईद मिलद–उन-नबीनिमित्त भायखळा खिलाफत हाऊस येथून दरवर्षी मोठया प्रमाणावर जुलूसचे आयोजन करण्यात येते.
मुंबई : पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांची जयंती मुंबईत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जात असून, त्यांच्या जयंतीदिनी ईद मिलद–उन-नबीनिमित्त भायखळा खिलाफत हाऊस येथून दरवर्षी मोठया प्रमाणावर जुलूसचे आयोजन करण्यात येते. जुलूसकरिता बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडलेल्या प्रस्तावाला महापौरांनी मंजुरी देऊन सोयीसुविधेबाबत स्थायी समिती सभागृहात ७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने जुलूसच्या सोयीसुविधेबाबत बैठक आयोजित केली असून, अल्पकालावधीत सुद्धा चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी ही बैठक दोन महिन्याअगोदर आयोजित करू, जेणेकरून सोयीसुविधेबाबत साधकबाधक चर्चा करणे शक्य होईल असेही ते म्हणाले.
यशवंत जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की , जुलुसमध्ये मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम बंधू – भगिनी उत्साहाने सहभागी होत असून, १० नोव्हेंबर रोजी भायखळा खिलाफत हाऊस येथून निघणारा जुलूस हा मदनपुरा, दोनटाकी, जे. जे. रुग्णालय मार्गे कॉफर्डमार्केट, हजहाऊसपर्यंत निघणार आहे. या जुलूसमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित अनेक तैलचित्रे, देखावे व प्रतिकृतीचे रथ तयार करून या जुलूसमध्ये त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच जुलूसमध्ये सहभागी होणा-या मुस्लिम बंधू–भगिनी आणि लहान मुलांकरिता आरोग्य सेवा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची सुविधा, साफसफाई, अन्नाची पाकिटे आणि इतर सोयीसुविधा पुरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पुढील प्रत्येक वर्षी मनपाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये सदर सोयी–सुविधा पुरविण्याकरिता दोन कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.