Join us

किराणा दुकानांतील वाईन विक्रीला मंजुरी, विरोधकांच्या आंदोलनानंतरही राज्य सरकार निर्णयावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 12:55 PM

Maharashtra News: ‘वाईनची सुपर मार्केट, किराणा दुकानांमध्ये विक्री करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सकाळी म्हटले खरे, पण दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीच्या गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. 

मुंबई/बारामती : ‘वाईनची सुपर मार्केट, किराणा दुकानांमध्ये विक्री करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सकाळी म्हटले खरे, पण दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीच्या गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

सुपर मार्केट व एक हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागेतील किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री करण्याची अनुमती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या २७ जानेवारीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यावरून विशेषत: विरोधी पक्ष भाजपने टीकेची झोड उठविली आणि जागोजागी आंदोलनेही केली जात आहेत. शरद पवार यांनी बुधवारी सकाळी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना वाईनबाबतची भूमिका स्पष्ट केली. ‘वाईन आणि इतर लिकरमधील फरक जाणून घेतला पाहिजे. तो घेतला नाही आणि विरोध होत असेल तर सरकारने वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही. हा विषय फार चिंताजनक आहे, असे मला वाटत नाही. तरीही काही राजकारण्यांना वाटत असेल आणि त्यावर राज्यकर्त्यांनी वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर त्यात फारसे वावगे ठरणार नाही’ असे विधान पवार यांनी केले. त्यामुळे आता राज्य सरकार वाईन विक्रीसंदर्भातील निर्णय मागे घेणार, अशी जोरदार चर्चा लगेच सुरू झाली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर केले जाते. ते निर्णयांवर शिक्कामोर्तब असते.

वाईनचा खप तुलनेने अत्यंत कमीदेशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने अत्यंत कमी आहे. सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. तेेथे १८ वायनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते, असे शरद पवार म्हणाले.   

दारू कोणत्या पक्षात जास्त पितात, यावर वादवाईनच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या भाजपचेच नेते सर्वाधिक दारू पितात. त्यांचे दारू कारखाने अन् बीअरबार आहेत, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यावर, कोण जास्त पितात याचा नीट हिशेब केला तर तुमचेच चेहरे दिसतील, असा प्रतिहल्ला भाजपचे आ. राम कदम यांनी चढविला.  

अर्थसंकल्प पाहिल्यानंतर निराशाशेतकऱ्यांसाठी अधिक गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती. पण त्याची पूर्तता झाली नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अर्थसंकल्पात काही करायचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा काही फायदा होईल असे वाटत नाही. सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेशची आहे. तेथे शेती हा महत्त्वाचा घटक आहे. तोच नाराज झाला आहे. - खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :महाराष्ट्र सरकार