Join us

एमएमआरडीए अर्थसंकल्पास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:06 AM

पायाभूत सुविधांकरिता १२ हजार ९६९.३५ कोटी, मेट्रो प्रकल्पाकरिता ४ हजार ५७१.२५ कोटीसार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो प्रकल्पांवर भर, मेट्रो-२ ...

पायाभूत सुविधांकरिता १२ हजार ९६९.३५ कोटी, मेट्रो प्रकल्पाकरिता ४ हजार ५७१.२५ कोटी

सार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो प्रकल्पांवर भर, मेट्रो-२ अ आणि मेट्रो - ७ धावणार

वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विविध पावले उचलली जात असून, मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत १२ हजार ९६९.३५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सेवा-सुविधांवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२१-२२ या अर्थसंकल्पीय वर्षात १२ हजार ९६९.३५ कोटी खर्च अपेक्षित असून, ९ हजार ८३३.७५ कोटी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक, मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व कमी वेळेत होणे शक्य होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे, तर मेट्रो मार्ग - २ अ (दहिसर-डी.एन. नगर (अंधेरी) व मेट्रो मार्ग - ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) या मार्गिकांवर प्रवासी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

.....................

प्रकल्प आणि तरतूद कोटींमध्ये

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग - ३ : २५०

मेट्रो २ अ : ७००.६५

मेट्रो ७ : ९९९.४५

मेट्रो प्रकल्प : ४ हजार ५७१.२५

मेट्रो भवन, मेट्रो कर्मचारी निवासस्थानांकरिता : ३२९.३०

मोनोरेल : १२०.२०

मुंबई पारबंदर मार्ग : २ हजार ९००.३५

बाळासाहेब ठाकरे स्मारक : १००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक : २६०

कलानगर उड्डाणपूल : ६०

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प : ४०५

एमयूआयपी प्रकल्प : ७७६.८५

मेट्रो नियोजन, बहुवाहतूक आराखडा : ३००

जलस्रोताचा विकास : ६१३.३५

सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारित : २००

छेडानगर जंक्शन : ६०

पूर्व/पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल व दुरुस्ती : २००

सिटीपार्क ते निसर्ग उद्यान पादचारी पूल : ७७.०५

इतर प्रकल्प : ९८३.३५

.....................

स्थानक बदलास मंजुरी

मेट्रो मार्ग - २ ब (डी. एन. नगर ते मंडाळे) येथील विस्तारीकरणास, स्थानक बदलास आणि मेट्रो मार्ग-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) येथील स्थानक बदलास मंजुरी देण्यात आली.

.....................

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास मंजुरी

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पृष्ठभागाच्या कामकाजाकरिता आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कामकाजांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली.

.....................

सर्वेक्षण व अनुदाने याकरिता १७५.३५, कर्ज वितरण व सुरक्षा ठेवीकरिता २७३, प्रशासकीय भांडवली खर्चाकरिता ५४८.६० कोटी तरतूद आहे.