Join us

खड्ड्यांच्या बागुलबुवाला भीत रस्ते दुरुस्तीला मंजुरी

By admin | Published: January 06, 2017 4:56 AM

नवीन रस्त्यांवर दुरुस्तीचा फेटाळलेला प्रस्ताव, प्रशासनाने गुरुवारी पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर आणला. दुरुस्तीच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी न दिल्यास पावसाळ्यात रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतील

मुंबई : नवीन रस्त्यांवर दुरुस्तीचा फेटाळलेला प्रस्ताव, प्रशासनाने गुरुवारी पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर आणला. दुरुस्तीच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी न दिल्यास पावसाळ्यात रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतील, असे चित्र प्रशासनाने उभे केले. निवडणुकीचा काळ जवळ असल्याने, नगरसेवकांनी खड्ड्याच्या बागुलबुवाला भिऊन रस्त्यांच्या त्या सात प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. मात्र, यात नवीन रस्ते असल्यास वगळण्यात येतील व दोषी अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. रस्तेदुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने आणलेल्या ९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी दप्तरी दाखल केले होते. अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी निवडलेले रस्ते काही महिन्यांपूर्वीच तयार झाले असल्याचा दावा सदस्यांनी केल्यानंतर, हे स्थायी समितीने रोखले होते. मात्र, पालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असल्याने, आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अधिकारात तातडीची बैठक बोलावली. यामध्ये ३२४ कोटींचे दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पावसात खड्डेमुक्त मुंबईसाठी आतापासूनच कामाला लागणे आवश्यक आहे. रस्त्यांचे सांधे भरणे आदी कामे पावसापूर्वीच पूर्ण केली, तर खड्डे पडणार नाहीत. मात्र, या कामांत नवीन रस्ते असल्यास त्यांची चाचपणी करून हे रस्ते वगळण्यात येतील, तसेच हमी कालावधीतला रस्ता आढळला, तर ते काम तत्काळ करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी हमी आयुक्तांनी दिली. (प्रतिनिधी)