५४ हजार ७७७ कोटींच्या एमयूटीपी ३-अ ला राज्य शासनाची अखेर मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:17 AM2018-12-09T02:17:46+5:302018-12-09T05:39:44+5:30
मुंबईच्या लोकल सेवेला अत्याधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रु पयांच्या आराखड्यास अखेर महाराष्ट्र शासनाने बुधवारी अंतिम मंजुरी दिली
- नारायण जाधव
ठाणे : मुंबईच्या लोकल सेवेला अत्याधुनिक रूप देण्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रु पयांच्या आराखड्यास अखेर महाराष्ट्र शासनाने बुधवारी अंतिम मंजुरी दिली. त्यातील ५० टक्के हिस्सा अर्थात २७ हजार ३८९ कोटी रुपयांचा वाटा उचलण्यास महाराष्ट्र शासनाने समंती दर्शविली आहे.
आता हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे. सात हजार कोटी रुपये कर्ज घेण्यात येणार असून उर्वरीत खर्चाचा भार मुंबई, नवी मुंबई महापालिकेसह सिडको आणि एमएमआरडीएवर राहणार आहे. भविष्यात वसई-विरार आणि पनवेल महापालिकेवर या खर्चाचा भार ढकलला जाणार आहे.
एमयूटीपी ३ अ मधील सर्व प्रकल्प रेल्वेचे आहेत. त्यातील नफा रेल्वे कमविणार आहे. त्याचा ५० टक्के हिस्सा अर्थात मात्र,२७ हजार ३८९ कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र शासन १२ हजार ५६७ कोटींचाच वाटा उचलणार असून यातील सात हजार कोटी रुपये कर्ज रुपाने तर उर्वरीत खर्चाचा भार एमएमआरडीए ३६३५.३० कोटी, सिडको १७९४.३० कोटी, मुंबई महापालिका १७९४.३० कोटी, नवी मुंबई महापालिका ५९८.१० कोटी यांच्यावर टाकला आहे.
एमयूटीपी ३-अ अंतर्गत होणारी कामे
सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्ग - १२ हजार १३१ कोटी रु पये
पनवेल-विरार कॉरिडोर - ७०८९ कोटी रुपये
गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार - ८२६ कोटी रुपये
बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका- २१८४ कोटी रुपये
कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका - १७५९ कोटी रुपये
कल्याण यार्ड आधुनिकीकरण- ९६१ कोटी रुपये
सीबीटीसी सिग्नल यंत्रणा - ५८२८ कोटी रुपये
स्थानक विकास - ९४७ कोटी रुपये
२१० एसी लोकल - १७ हजार ३७४ कोटी रु पये
गाड्यांसाठी देखभाल सुविधा - २३५३ कोटी रुपये