यापुढे २५ झाडेही तोडण्यास हवी वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 01:55 AM2020-03-01T01:55:43+5:302020-03-01T01:55:49+5:30
पालिका आयुक्तांच्या अधिकारात विकास कामासाठी २५ झाडे तोडण्याची परवानगी देणारा अधिकार काढून घेण्यात येणार आहे.
मुंबई : पालिका आयुक्तांच्या अधिकारात विकास कामासाठी २५ झाडे तोडण्याची परवानगी देणारा अधिकार काढून घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पालिका महासभेत घेण्यात आला आहे. त्यानुसार, विविध विकास कामांमध्ये बाधित ठरणारी २०५ झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शनिवारी फेटाळण्यात आले आहेत.
राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी पालिका आयुक्तांना ‘वन संवर्धन कायदा-७५’अंतर्गत २५ झाडे तोडण्याचा अधिकार दिला होता. मात्र, अनेक विकासक आणि आस्थापनांनी याचा लाभ उठवत, शेकडो झाडे तोडण्यासाठी २५-२५ झाडांचे प्रस्ताव आणून मंजुरी मिळविली. यामध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल पंधरा हजारांवर झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यामुळे पालिका आयुक्तांना २५ झाडे तोडण्याचा दिलेला अधिकार रद्द करण्याची ठरावाची सूचना महासभेत मंजूर करून घेण्यात आली. त्यामुळे शनिवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत २०५ झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव मांडण्यात आले होते. यामध्ये खासगी आणि काही आस्थापनांच्या कामासाठी ही झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, रेल्वेच्या उपक्रमासाठी केवळ एक झाड तोडण्यास मंजुरी देण्यात आली, तर २०५ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.