Join us

गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी प्रतिबंध विधेयक मंजूर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 5:52 PM

महाराष्ट्रातील मच्छीमारांमध्ये संताप

मनोहर कुंभेजकर

मुंबई :  गुजरात विधानसभेत नुकतेच एक विधेयक मंजूर करून घेतले आहे, त्या नुसार गुजरात राज्याच्या सागरी हद्दीत इतर राज्यातील मासेमारांनी मासेमारी केल्यास एक लाख रुपया पर्यंत दंड व त्यांनी त्या दिवशी पकडलेल्या माशांच्या पाचपट दंड आकारण्यात येणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे, हे खरोखरच अन्याय करणारे असुन संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मच्छीमार सेलचे मुंबई अध्यक्ष प्रदीप टपके यांनी दिली आहे. महाराष्ट्रात देखिल अश्याप्रकारचे विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मंजूर करावे या मागणीसाठी मच्छिमारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत खरेतर गुजरात राज्यातील बहुसंख्य मच्छीमारी बोटी सर्रास मासेमारी करित आहेत. मुंबईतील भाऊच्या धक्का येथे मासेमारी व्यवसायासाठी गुजरात राज्यातील साधारण १२०० ते १५०० बोटी येतात, व त्यासुद्धा धोकादायक व ज्यावर बंदी आहे अशा प्रकरची ग्रुप पध्दतीची फिशिंग करित आहेत, तरी त्यांना महाराष्ट्र सरकार मज्जाव करत नाही. आजही रत्नागिरी, दाभोळ पासून हर्णे पर्यंत हजारोंच्या संख्येने गुजरात राज्यातील मच्छीमारी बोटी मासेमारी करत आहेत अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.

गुजरात राज्याने मंजूर करून घेतलेल्या विधेयकामुळे, महाराष्ट्रातील मच्छीमारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे, प्रसंगी दोन्ही राज्यातील मच्छीमारांमध्ये समुद्रामध्ये तंटाबखेडा निर्माण होऊन वित्त व मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा गुजरात व इतर राज्यातील येणाऱ्या मच्छीमार बोटींना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करण्यास मज्जाव करावा अशी मागणी प्रदीप टपके यांनी शेवटी केली आहे.

 

टॅग्स :मच्छीमारमहाराष्ट्रगुजरातमुंबई