मुंबई - वर्सोवा खाडीत साचलेल्या गाळामुळे येथील मच्छीमार बांधवांच्या बोटी रुतून बसतात. अनेकदा त्यांचे अपघात होतात. त्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या संदर्भात वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार कोटी एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे 1,28,586 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा गाळ नियमित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी आमदार लव्हेकर यांनी लावून धरली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी वर्सोवा साचलेला गाळ काढण्याविषयी लक्षवेधी लावली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष बैठक लावण्याचे सभागृहामध्ये आश्वासन दिले होते. त्यानुसार वर्सोव्यातील साचलेल्या गाळा संदर्भात त्यांनी नुकतीच बैठक लावली होती. या बैठकीला आमदार लव्हेकर व मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागणीची दखल घेत गाळ काढण्यासंदर्भात आवश्यक निधी मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.वर्सोवा खाडीतील साचलेला गाळ काढण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी वर्सोवा येथे सागरी किनारी मच्छीमारांसाठी अद्यावत सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 336 कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे प्रेझेंटेशन यावेळी दाखवण्यात आले. अद्यावत जेट्टी वर्सोवा येथे उभारण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली होती.