बारावीच्या १५ एप्रिल, तर दहावीच्या परीक्षा १ मेनंतर : वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:06 AM2021-01-04T04:06:07+5:302021-01-04T04:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीबीएसई बोर्डाने मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीएसई बोर्डाने मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी चाचपणी सुरू केलेली आहे. कोरोनासंदर्भातील परिस्थिती लक्षात घेता यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मेनंतर घेण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी स्पष्ट केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा आणि नियमित शाळा सुरू करण्यासंदर्भात माहिती दिली. सीबीएसईने मे महिन्यात परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बोर्डाच्या परीक्षांबाबत चाचपणी सुरू आहे. आम्हीदेखील १५ एप्रिलनंतर बारावीच्या आणि १ मेनंतर दहावीच्या परीक्षा घेण्याच्या विचारात आहोत. तर, २३ नोव्हेंबरपासून ९वी ते १२वीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला होता. आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेत असताना ब्रिटनमधून कोरोनाचा नवा विषाणू आल्यामुळे आणखी थोड्या दिवसांची वाट बघून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यानंतच्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत कोणताही निर्णय घेताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई आणि पुणेवगळता राज्यातील अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी अलीकडेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. ४ मे ते १० जून या कालावधीत सीबीएसईच्या परीक्षा होणार आहेत, तर, १५ जुलैला परीक्षांचा निकाल जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही राज्य मंडळाच्या परीक्षांच्या संभाव्य कालावधीची माहिती दिली.