राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ जणांना कौशल्य विभागाच्या माध्यमातून रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:22+5:302021-05-07T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रयत्नातून राज्यात एप्रिल महिन्यात ८ हजार २५९ बेरोजगारांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रयत्नातून राज्यात एप्रिल महिन्यात ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. यातून गेल्यावर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
एप्रिलमध्ये विभागाकडे १९ हजार ०५५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात ५ हजार ८०९, नाशिक विभागात २ हजार ७५७, पुणे विभागात ४ हजार ९९७, औरंगाबाद विभागात ३ हजार ३७०, अमरावती विभागात १ हजार १४४ तर नागपूर विभागात ९७८ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. तर एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ८ हजार २५९ उमेदवार नोकरीला लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ९९५, नाशिक विभागात १ हजार ३०२, पुणे विभागात १ हजार ७५७, औरंगाबाद विभागात ८६९, अमरावती विभागात ३१४ तर नागपूर विभागात २२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीला लागले.
.....................................