Join us

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ‘एप्रिल फूल’; केंद्रावर क्षमतेपेक्षा केली अधिक विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 7:09 AM

वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेला ५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

मुंबई : परीक्षांच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून होणाऱ्या गोंधळाची परंपरा विभागाने येणाऱ्या उन्हाळी सत्र परीक्षांसाठी कायम ठेवली आहे. येत्या ५ तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी त्या परीक्षा केंद्राच्या विद्यार्थी क्षमतेच्या पाचपट विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. चूक लक्षात आल्यावर लवकरच दुसरी बैठक व्यवस्था करून विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राच्या परीक्षेला ५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. विद्यापीठाने पाठविलेले पत्र जे. एम. पटेल महाविद्यालयाने संकेतस्थळावर बुधवारी पाहिले. त्यात वाणिज्य शाखेच्या २०१५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याची सूचना केली होती. वस्तुत: महाविद्यालयात जास्तीत जास्त ३५० विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल एवढीच आहे. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न महाविद्यालय प्रशासनाला पडला. चूक लक्षात आणून दिल्यानंतर परीक्षेची आसन व्यवस्था ही अस्थायी असून येत्या काही दिवसांत निश्चित व्यवस्था जाहीर करण्यात येणार आहे, असे आश्वासन विद्यापीठाने दिले. 

अद्याप केंद्र बदलून मिळाले नाही 

या प्रकरणाची माहिती शुक्रवारी युवासेना माजी सिनेट सदस्यांनी परीक्षा विभागाकडून घेतली असता अद्याप विद्यार्थ्यांना केंद्र बदलून दिले नाही. मात्र, शनिवारपर्यंत ते दिले जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान या आधीही परीक्षेसाठी विद्यापीठाने महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिली आहेत.

टॅग्स :परीक्षा