‘अप्सरा’ अणुभट्टी नव्या रूपात कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:02 AM2018-09-12T05:02:06+5:302018-09-12T05:02:08+5:30
भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) ट्रॉम्बेमधील संकुलात ‘अप्सरा-यू’ हीे उन्नत अणुभट्टी सोमवारी सायंकाळी ६.४१ वाजता कार्यान्वित झाली.
मुंबई : भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) ट्रॉम्बेमधील संकुलात ‘अप्सरा-यू’ हीे उन्नत अणुभट्टी सोमवारी सायंकाळी ६.४१ वाजता कार्यान्वित झाली. वरुन पाहिल्यास जलतरण तलावासारखी दिसणारी ही अणुभट्टी प्रामुख्याने संशोधनाच्या प्रयोजनासाठी असेल.
याच जागी ‘अप्सरा’ ही भारताची पहिली संशोधन अणुभट्टी ६२ वर्षांपूर्वी म्हणजे आॅगस्ट १९५६ मध्ये कार्यान्वित केली होती. निर्धारित आयुष्य संपल्याने ती सन २००९ मध्ये बंद केली. आता तेच जुने नाव कायम ठेवून अधिक ही नवी उन्नत अणुभट्टी उभारण्यात आली आहे.
अणुभट्टीसाठी निम्न दर्जाचे प्रभारित युरेनियम इंधन म्हणून वापरण्यात येते. यातून न्यूट्रॉनचा मारा अधिक होत असल्याने आधीच्या तुलनेत ५० टक्के अधिक रेडिओ आयसोटोप भट्टीतून उपलब्ध होतील. ही नवी अणुभट्टी भारतीय बनावटीची असून तिच्या उभारणीने भारतीय तंत्रज्ञ, वैज्ञानिकांची गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानावर हुकुमत सिद्ध झाली आहे.