अभियोग्यता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारीपासून, राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:29 AM2023-01-31T11:29:04+5:302023-01-31T11:29:41+5:30
Exam: गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आणि शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली आणि शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘पवित्र पोर्टल’ प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१७ मध्ये घेतला होता. त्यानुसार, डिसेंबर, २०१७ मध्ये टीएआयटी परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्या वतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर, सहा वर्षे उलटली, तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखांहून अधिक डीएड-बीएडधारक आणि ५४ हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतीक्षेत होते.
अभियोग्यता चाचणी म्हणजे?
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (टीईटी) झाल्यानंतर घेण्यात येणारी दुसरी चाचणी म्हणजे ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता’ परीक्षा होय. या चाचणीतील गुणांच्या आधारे आता शिक्षक भरती केली जात आहे. भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी - ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी
परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी - ८ फेब्रुवारी रात्री
११.५९ पर्यंत.
प्रवेशपत्र ऑनलाइन मिळण्याचा कालावधी - १५ फेब्रुवारीपासून.
ऑनलाइन परीक्षा तारखा - २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत (उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधांनुसार बदल होण्याची शक्यता)