गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लग्नकार्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सह दोन वेगवेगळया कुटुंबांनी मालाड पश्चिमच्या आक्सा बीचजवळ असलेल्या हॉटेलची निवड केली. मात्र जेवणाचे कंत्राट घेणाऱ्या कॅटरर्सने त्यांना ६७.६० लाख रुपयांचा चुना लावला. तसेच त्यांनी जाब विचारल्यावर एकाला धमकवण्यातही आले. याविरोधात अखेर त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करवला.
तक्रारदार कांदिवली पश्चिम याठिकाणी राहत असून ते त्यांच्या २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान असलेल्या विवाह समारंभासाठी मालाड पश्चिमच्या आक्सा बीचवर असलेल्या द रिसॉर्ट हॉटेलमध्ये तीन दिवस आणि दोन रात्र बुकिंग करायला गेले होते. हॉटेल बुक करताना त्यांना व्हेज जेवण हवे असल्याने यश कॅटरर्सचा चालक हितेश राठोड याच्याशी संपर्क करायला हॉटेल प्रशासनाकडून सुचवीण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने होणाऱ्या सासऱ्यांसह कांदिवली पश्चिम च्या महावीर नगर परिसरात असलेल्या यश कॅटर्स कार्यालयात जानेवारी, २०२३ मध्ये संपर्क साधला. भामट्या राठोडने त्यांना लग्नाच्या पॅकेजमध्ये जेवण, राहणे, मैदान, डेकोरेशन मिळून ३५ लाखांचा खर्च होईल असे सांगितले. तक्रारदाराने मार्च, २०२३ ते अद्याप २८ लाख ६० हजार रुपये बँक खात्यातून तसेच रोख रकमेच्या स्वरूपात राठोडला दिले. मात्र अचानक ११ डिसेंबर रोजी राठोडने व्हाट्सअप मेसेज करत मी तुमच्याकडून घेतलेले पैसे रिसॉर्टला दिले नसून कार्यक्रमाची तारीख राखून ठेवली आहे असे कळवले.
तक्रारदाराने हॉटेलमध्ये धाव घेतल्यानंतर राठोड अनेक लोकांचे पैसे घेऊन गायब झाल्याचे त्यांना समजले. तसेच गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका नोकरदाराला देखील त्याने अशाच प्रकारे हॉटेल बुक करून देण्याचे आमिष दाखवत ३९ लाख रुपयांचा चुना लावला. त्या व्यक्तीने राठोडला याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने त्यांना धमकावले. अखेर याप्रकरणी कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर राठोड विरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६,४२० आणि ५०६ अंतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.