मत्स्यालयातील ‘तारा’ पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:23 AM2019-03-10T05:23:18+5:302019-03-10T05:23:39+5:30
जागा कमी पडत असल्याने केले ‘मुक्त’
डहाणू/मुंबई : मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयातील पाच वर्षीय तारा नावाच्या ‘ग्रीन सी’ प्रजातीच्या मादी समुद्र कासवाला शुक्र वारी महिला दिनाच्या औचित्यावर डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आले. वाढत्या वयामुळे मत्सलयातील जागा अपुरी पडत असल्याने, हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
चर्नी रोड येथील तारापोरवाला मत्स्यालयातील २५ ते ३० वयाच्या दोन सागरी कासवांचा आकस्मिक मृत्यू झाला होता, तर ‘ग्रीन सी’ प्रजातीची साधारण पाच वर्षांची मादी पोटाच्या आजाराने ग्रस्त होती. याकरिता समुद्री कासवांवर उपचार करणारे तज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी तिच्यावर उपचार करीत देशातील पहिले कासव उपचार केंद्र असलेल्या डहाणू येथील वनविभागाच्या आवारातील सुश्रूषा केंद्रात पाठविले होते.
येथे डब्ल्यूसीएडब्ल्यूए ही संस्था समुद्री कासव आणि वन्यजिवांकरीताकार्यरत आहे. जून, २०१८ साली आलेल्या तारापोरवाला मत्स्यालयातील त्या कासवाचे नामकरण ‘तारा’ असे या संस्थेने केले. ताराला पोटाचा संसर्ग झाल्याने अन्नग्रहण करण्यास त्रास होत होता. या उपचार केंद्रात तिच्यावर ४५ दिवस उपचार करण्यात आले.
पाच महिन्यांच्या देखभालीनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने, पुन्हा तारापोरावाला मत्स्यालयाच्या प्रदर्शन टाकीत सोडण्यात आले. परंतु मत्स्यालयातील १६ फूट लांब आणि १२ फूट रुंदीची टाकी वाढत्या आकारामुळे छोटी पडू लागली. त्यामुळे ३१ जानेवारीला मत्स्यव्यवसाय विभागाचे पत्र डब्ल्यूसीएडब्ल्यूएकडे पाठवून ताराला पुन्हा डहाणूच्या पुनर्वसन केंद्रात ठेवण्याची विनंती करण्यात आल्याचे या संस्थेचे संस्थापक धवल कंसारा यांनी सांगितले. त्यानंतर डहाणू खाडीतील कौशल्या या मच्छीमार बोटीतून तिला समुद्रात सोडले.
या वेळी मत्स्यालयातील अभिरक्ष पुलकेश कदम, पशुवैद्य दिनेश विन्हेरकर, पालघर जिल्हा मानद वन्यजीवरक्षक धवल कंसारा, वन कर्मचारी आणि वाइल्डलाइफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
पोहण्याच्या घेतल्या तीन चाचण्या
तिच्यावर जून, २०१८ पासून ठरावीक काळात उपचार करण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोहण्याची क्षमता पाहता मोठ्या जागेची आवश्यकता होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे मोठी टाकी बांधणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे तिला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. १ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत तिच्या हालचालीकडे लक्ष दिले गेले. या काळात तिच्यावर पोहण्याच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर समुद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
- डॉ. दिनेश विन्हेरकर (तारावर उपचार करणारे पशुवैद्य)
ताराची ओळख पटणार मायक्रोचिपद्वारे
या उपचार केंद्रावर आलेल्या कासवाचे ज्याप्रमाणे नामकरण केले जाते, तसेच मायक्रोचिप बसविली जाते. तिच्या शरीरात युनिव्हर्सल मायक्रोचिप बसवून समुद्रात सोडण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ती एखाद्या किनाऱ्यावर आढळल्यास ओळख पटविणे शक्य होणार आहे. मायक्रोचिप रीडरच्या साहाय्याने त्याच्या सांकेतिक क्र मांकाची माहिती मिळविता येणे शक्य होणार आहे.