एड्सग्रस्तांसाठी वरदान ठरली ‘एआर’ थेरपी; चार वर्षांत घटले बाधितांचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:52 AM2022-12-05T08:52:09+5:302022-12-05T08:52:19+5:30

१९८ गर्भवती घेत आहेत उपचार

'AR' therapy is a boon for AIDS sufferers; The number of infected has decreased in four years | एड्सग्रस्तांसाठी वरदान ठरली ‘एआर’ थेरपी; चार वर्षांत घटले बाधितांचे प्रमाण

एड्सग्रस्तांसाठी वरदान ठरली ‘एआर’ थेरपी; चार वर्षांत घटले बाधितांचे प्रमाण

Next

स्नेहा मोरे

मुंबई : एड्स हा जगातील सर्वात घातक आजार म्हणून समजला जातो. एखाद्याला एड्सची लागण झाली की मृत्यू हाच त्याच्या सुटकेचा मार्ग. मात्र, अँटिरिट्रायव्हल थेरपी (एआरटी) ही उपचारपद्धती एड्सग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे. या थेरपीमुळे त्यांचे आयुष्य वाढत आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये १९८ गर्भवती महिला नियमितपणे एआरटी औषधे घेत आहेत. 

शहर-उपनगरांतील आयसीटीसी केंद्रामध्ये समुपदेशन व चाचणीद्वारे एचआयव्ही संसर्गित आढळलेल्या रुग्णांना एआरटी केंद्राकडे पाठवून पुढील औषधोपचारांची दिशा ठरवली जाते. रुग्णांचे चाचणीपूर्व समुपदेशन करून त्यांचा आहार, घ्यावयाची काळजी व जीवनमान वाढवण्यासाठी मानसिक आधार याबाबत मार्गदर्शन केले जाते.

तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या तपासण्या करून नियमितपणे एआरटी औषध सुरू केले जाते. अशा रुग्णांना आजार होण्याची शक्यता असल्याने रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. पांढऱ्या पेशींची संख्या सीडीफोर ५०० पेक्षा कमी असल्यास तत्काळ एआरटी औषध प्रणाली सुरू केली जाते. नवीन ‘ट्रीट ऑल’ पॉलिसीनुसार एचआयव्ही संसर्गितांना लगेचच औषधे सुरू करण्यात येतात. रुग्णाच्या पांढऱ्या पेशींचे प्रमाण जाणण्याकरता केली जाणारी सीडीफोर ही महागडी तपासणी एआरटी केंद्रात मोफत होते. समुपदेशन, चाचणी औषध देणे व पाठपुरावा या चार टप्प्यांवर काम केले जाते. आयुष्यभर घ्याव्या लागणाऱ्या एआरटी औषधामुळे रुग्णांचे आयुर्मान वाढण्यास निश्चितच मदत होते आहे. त्यामुळे एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांचे आयुष्य सुसह्य होण्यास मदत झाली आहे.

नियमितता हा उपचारांचा महत्त्वाचा भाग
एचआयव्हीवरील मोफत पुरवल्या जाणाऱ्या एआरटी औषधामुळे एचआयव्ही-एड्सह जगणाऱ्यांच्या आयुर्मानात वाढ झाली आहे. उपचारांमुळे आयुष्यमान, प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते व संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. रुग्णांना योग्यवेळी औषध मिळाले तर विषाणूची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. एआरटी योग्य पद्धतीने व नियमित घेणे हा या उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.
- डॉ. विजय करंजकर, उपसंचालक, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था

Web Title: 'AR' therapy is a boon for AIDS sufferers; The number of infected has decreased in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.