अरबी पाहुण्याचे लाखोंचे 'दिराम' पळवले ! गोरेगाव पोलिसात नोकरावर गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: February 14, 2024 04:45 PM2024-02-14T16:45:51+5:302024-02-14T16:46:04+5:30
हा प्रकार गोरेगाव पश्चिम परिसरात घडला असून याप्रकरणी पोलिसांनी राकेश पासवान (२५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई: व्यावसायिकाच्या घरात रहायला आलेल्या अरब देशातील एका पाहुण्याचे लाखो रुपयांचे दिराम नोकराने पळवून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार गोरेगाव पश्चिम परिसरात घडला असून याप्रकरणी पोलिसांनी राकेश पासवान (२५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार केन फर्नांडिस (४२) यांचा कपड्यांचा व्यवसाय असून ते त्यांच्या आईसोबत गोरेगाव पश्चिम परिसरात राहतात. त्यांच्या घरी २ जानेवारी २०२४ रोजी पासून पासवान हा १२ ते २ च्या दरम्यान घरकाम करण्यासाठी येतो. फर्नांडिस यांचे संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी राहणारे भारतीय वंशाचे मित्र दिनेश नायर (४८) हे ३ फेब्रुवारी रोजी त्यांचा रायगडला राहणारा भाऊ वासू नायर याच्याकडे आले होते. तिथून ते ११ फेब्रुवारीला फर्नांडिस यांच्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आदल्या रात्रीपासून उपस्थित होते. त्यांनी त्यांच्यासोबत लॅपटॉप बॅग आणि दोन सुटकेस आणल्या ज्या फर्नांडिस यांच्या बेडरूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
गृहप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दिनेश हे फ्लाईटने त्यांच्या घरी निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी फर्नांडिसना फोन करत त्यांच्या लॅपटॉप बॅगच्या कप्प्यात ठेवलेल्या जवळपास १ लाख १५ हजार २६० रुपये किमतीच्या दिराम गायब असल्याचे सांगितले. त्या नोटा त्यांनी मोजून ठेवल्या असून त्यानंतर त्यांच्या मार्फत कोणताही व्यवहार केला गेला नाही किंवा त्यांनी कोणाला पैसे दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी चौकशी केल्यावर ११ फेब्रुवारीला पासवान हाच नायर यांच्या बॅग ठेवलेल्या बेडरूममध्ये साफसफाई करायला गेला होता हे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यानेच ही चोरी केल्याचा आरोप असून याविरोधात त्यांनी गोरेगाव पोलिसात तक्रार दिली.