अर्नाळ्याचे पर्यटन रिक्षाचालकांच्या वेठीस
By admin | Published: April 8, 2015 10:49 PM2015-04-08T22:49:09+5:302015-04-08T22:49:09+5:30
या निसर्गरम्य किनारपट्टीवर आकर्षित होणाऱ्या पर्यटकांसाठी या परिसरात अनेक रिसॉर्टस् आहेत. आणखी काही नव्याने निर्माण होत आहेत
अर्नाळा : या निसर्गरम्य किनारपट्टीवर आकर्षित होणाऱ्या पर्यटकांसाठी या परिसरात अनेक रिसॉर्टस् आहेत. आणखी काही नव्याने निर्माण होत आहेत. परंतु या रिसॉर्टस्चे भवितव्य सध्या रिक्षावाल्यांनी वेठीस धरले आहे. पर्यटक रेल्वे अथवा , एसटी स्थानकावर उतरले की, ते रिक्षाने एखाद्या रिसॉर्टला येऊ पाहतात. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांना नेऊन सोडणे एवढेच रिक्षावाल्यांचे काम. परंतु, जो रिसॉर्टचा मालक जास्तीतजास्त कमिशन देईल त्याच्या रिसॉर्टकडे पर्यटकांना नेण्याकडे या रिक्षावाल्यांचा ओढा असतो. यामुळे रिक्षावाल्यांची चांदी होते. तर पर्यटक आणि रिसॉर्ट यांचे नुकसान होते.
अर्नाळ््यामध्ये जे दुसऱ्यांदा येत आहेत त्यांना परिसराची माहिती असते आणि ते त्यांच्या आवडीच्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाण्याची सूचना रिक्षाचालकांना करतात. तर जे प्रथमच येत असतात ते रेफरन्स किंवा नेट वरील माहितीच्या आधारे त्या रिसॉर्टमध्ये जाऊ पाहतात. परंतु, रिक्षाचालक अशा वेळी तिथे जाऊ नका, तिथे गडबड आहे, तिथे अनैतिक धंदे चालतात, धाडी पडतात, फॅमिलीसाठी ते योग्य नाही, ते महागडे आहे आम्ही सांगतो तिथे चला ते स्वस्त, चांगले आणि सुरक्षित आहे अशी दिशाभूल करतात. त्यामुळे घाबरलेले पर्यटक त्यांच्या या दिशाभूलीला बळी पडतात. त्यामुळे रिसॉर्ट किती सुसज्ज आहे, चांगले आहे, स्वच्छ आहे यापेक्षा रिसॉर्टचा मालक रिक्षावालांना प्रत्येक पर्यटकामागे किती जास्त कमिशन देता यावर रिसॉर्टचा व्यवसाय अवलंबून राहू लागला आहे. यासाठी रिसॉटस् मालकांनी सर्वप्रथम एकत्र येऊन रिक्षावाल्यांना कमिशन देण्याची प्रथा ताबडतोब बंद करण्याची आवश्यकता आहे. सर्व रिसॉर्टचालकांनी एकत्र येऊन भाडोत्री बस अथवा मिनी बस घेऊन तिच्या फेरी चालू करण्याची गरज आहे. तसेच आरटीओ आणि रिक्षा संघटना यांनाही विश्वासात घेऊन ही प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाही तर पर्यटकांचे समाधन करतील असे रिसॉर्टस् केवळ कमिशनच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकल्याने बंद पडतील व पर्यायाने इथल्या पर्यटन व्यवसायाचाच ऱ्हास होईल. (विशेष प्रतिनिधी)