नवरात्रीत आरास ड्रायफ्रूट, मिठाईची; पुढील आठवड्यात सुकामेव्याची आवक वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:25 AM2023-10-05T09:25:02+5:302023-10-05T09:25:14+5:30
दर उतरण्याची शक्यता
मुंबई : नवरात्रोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, खरेदीसाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे. या उत्सव काळात देवीला नैवेद्य म्हणून पंचपक्वान्नासह ड्रायफ्रूट, मिठाईची आरास करण्याचीही प्रथा आहे. येत्या आठवडाभरात सुकामेव्याची नव्याने आवक वाढणार असल्याने, दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे, तर मिठाईचे दर जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे या नवरात्रीत ड्रायफ्रूट, मिठाईची जोरदार खरेदी होण्याची चिन्हे आहेत.
गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेध लागले असून, तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात ठप्प झालेली ड्रायफ्रूट, मिठाईची मागणी वाढत आहे. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत मिठाई, ड्रायफ्रूट मोठ्या प्रमाणात विकला जातो. मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढतात. यंदा मात्र, परदेशातून येणारा सुकामेवा पुढील आठवडाभरात मुंबईत दाखल होईल, तसेच अगोदरचाही माल गोदामात उपलब्ध असल्याने, दर काही दिवसांत उतरणार आहेत.
८ ते १२ टक्क्यांनी हे दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. नवरात्रोत्सवात बऱ्याच जणांचे उपवास असल्याने, या काळात अंजीर, बदाम, काळे मनुके, काजू, बेदाणे, पिस्ता, अक्रोड असा सुकामेवा जास्त विकला जातो, अशी माहिती ड्रायफ्रूट विक्रेते दामजी पटेल यांनी दिली.
मिठाईचे दर जैसे थे
दरवर्षी नवरात्रीत मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदाही मिठाईचे दर स्थिर असून, मिठाईच्या दरात कोणतीही दरवाढ झालेली नाही. हे दर दिवाळीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे गणेश स्वीट मार्टचे आनंद छेडा यांनी सांगितले. या काळात पेढे, बर्फी, काजू कतली, बुंदीचे लाडू जास्त विकले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रायफ्रूटचा प्रसाद
नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पूर्वी शेंगदाणे, खडीसाखर, गूळ, फुटाणे आदी पदार्थ प्रसाद म्हणून दिले जायचे. आता मात्र, ट्रेंड बदलतोय. काही सेवेकरी, तसेच मंडळ मिक्स ड्रायफ्रूटचा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना वाटत असल्याचे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून सांगण्यात आले.
काजू, बदाम, मनुका
प्रसादासाठी तुकडा काजू, खारीक, काळे मनुके, बेदाणे, अमेरिकन बदामाची जास्त विक्री होते, अशी माहिती ड्रायफ्रूट विक्रेत्यांनी दिली.
येत्या काळात नवीन माल बाजारात येणार आहे. त्यामुळे ड्रायफ्रूटचे दर आणखी कमी होतील, अशी शक्यता आहे. हे दर कमी झाल्यास, उत्सव काळात सुकामेव्याची विक्री वाढेल.