Join us

टॅक्सी चालकांच्या मनमानीला चाप

By admin | Published: January 20, 2016 2:20 AM

रेल्वे हद्दीत येऊन प्रवाशांना सहकार्य न करता मनमानी कारभार करणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात पश्चिम रेल्वे आरपीएफकडून कारवाईचा बडगा

मुंबई : रेल्वे हद्दीत येऊन प्रवाशांना सहकार्य न करता मनमानी कारभार करणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात पश्चिम रेल्वे आरपीएफकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत दहा हजारांपेक्षा जास्त चालकांवरकारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली स्थानकाबाहेर रेल्वे हद्दीत टॅक्सी चालकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून या स्थानकांत उतरून सामानासह घरी परतणाऱ्या प्रवाशांनाही त्यांच्या मनमानीचा सामना करावा लागतो. याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या जात होत्या. मात्र कारवाई फारशी होत नसल्याने आरपीएफकडून पुढाकार घेण्यात आला. भाडे नाकारणे, जास्त भाडे घेणे, हुज्जत घालणे, अनधिकृतपणे पार्किंग या प्रकरणांत रेल्वे अधिनियम १५९ नुसार चालकांवर कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)