मुंबई : वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी चालक भर रस्त्यात गाड्यांची दुहेरी व तिहेरी पार्किंग करीत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. स्थानकाबाहेर टॅक्सी चालकांसाठी विशेष टॅक्सी स्टँडची सुविधा असूनदेखील टॅक्सी चालक भर रस्त्यात गाड्या पार्क करीत आहेत़ इतर वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहनांचे हॉर्न वाजविण्याचे प्रमाण वाढले आहे़ स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. झटपट भाडे मारण्याच्या नादात टॅक्सी भरधाव वेगात चालवत असल्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. अनेक चालकांकडे परवाना व बॅचदेखील नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.वडाळा वेल्फेयर फोरमच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांनी या समस्येच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनदेखील परिस्थिती जैसे थे आहे, असे रहिवासी सांगत आहेत. स्थानिक रहिवाशांमार्फत या टॅक्सी चालकांना समज दिली असता टॅक्सी चालक वाद घालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सकाळच्या वेळी होणारा त्रास कमी झाला आहे. परंतु संध्याकाळच्या वेळेस टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार सुरूच असतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या टॅक्सी चालकांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी वडाळा वेल्फेयर फोरमने केली आहे.>स्थानिकांच्या तक्रारीनंतर वडाळा स्थानकाबाहेरील बेशिस्त टॅक्सी चालकांवर सतत कारवाई सुरू असते व ती यापुढेदेखील सुरू राहील. यापुढे कारवाईसाठी त्या परिसरात वाहतूक पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल. स्थानिक पोलीस स्टेशनचीदेखील मदत घेण्यात येईल.- सुनील पवार (पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग भोईवाडा)
वडाळा स्थानकाबाहेर टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:55 AM