अरीब माजीदवर आरोपपत्र दाखल
By admin | Published: May 21, 2015 02:13 AM2015-05-21T02:13:56+5:302015-05-21T02:13:56+5:30
भारताच्या मित्र राष्ट्रांविरोधात युद्ध पुकारणे, असे गंभीर आरोप कल्याणच्या अरिब माजीद या तरूणावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवले आहेत.
मुंबई : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होणे, संघटनेच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि भारताच्या मित्र राष्ट्रांविरोधात युद्ध पुकारणे, असे गंभीर आरोप कल्याणच्या अरिब माजीद या तरूणावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवले आहेत. बुधवारी एनआयएने अरिबविरुद्ध सुमारे साडेआठ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.
एनआयएने सात खंडात तयार केलेल्या आरोपपत्रात अरीब इसिसकडे कसा आकृष्ट झाला, त्याच्यात जिहादी विचार कसे व कुठे भिनवण्यात आले, त्याने अन्य तीन मित्रांसोबत इसिसच्या तथाकथित लढाईत सहभागी होण्यासाठी भारतातून कसे पलायन केले, त्याने परदेशात कुठे वास्तव्य केले, त्याला तेथे कोणी व कसे सहकार्य केले याचा समावेश आहे. तसेच इसिसच्या प्रशिक्षण शिबिरात तो कसा पोचला, प्रत्यक्ष लढाईत कसा सहभागी झाला, लढाई दरम्यान त्याला झालेली दुखापत, त्यानंतर तो भारतात कसा परतला हा सर्व घटनाक्रम देखील आरोपपत्रात नमूद आहे. एनआयएने तपासाला बळ देणाऱ्या एकूण ११३ साक्षीदारांची नावे बंद लिफाफ्यात न्यायालयासमोर ठेवली. अरिबविरोधात अनलॉफूल अॅक्टिव्हीटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट या कठोर कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर त्याच्याविरोधात या कलमांनुसार खटला चालेल.
अरिबने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यापासून इसीसने सोशल मीडियावरून प्रसारित केलेले व्हीडियो डाऊनलोड करून पाहण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याच्या मनात अधिकाधिक कुतूहल निर्माण झाले. कुतूहलापोटी शोधाशोध सुरू असतानाच अरिब फहाद शेख नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला. एनआयएने आरोपपत्रात केलेल्या दाव्यानुसार ईसीसचे ‘मॅगनेटगॅस’ नावे टिष्ट्वटरवरील हॅण्डल फहाद हाताळत होता. या हॅण्डलवरून ईसीसच्या कारवायांचा प्रचार आणि प्रसार सुरू होता. फहादसोबत अरिब तासन्तास चर्चा करू लागला. याच चर्चेतून तो शाहीम तानकी, अमन तांडेल या कल्याणमध्येच राहाणाऱ्या अन्य तरुणांच्या संपर्कात आला. पुढे या चौघांनी झियारतच्या नावाखाली भारताची सीमा ओलांडली. इराकमध्ये स्थानिक सीमकार्डांद्वारे त्यांनी रेहमान दौलती आणि अबू फातिमा या दोघांशी संपर्क साधला. अबूने या चौघांना इसिसच्या प्रशिक्षण शिबिरापर्यंत पोहोचण्यात मदत केली. तेथे अलीने त्यांना इसिसमध्ये सहभागी करून घेतले. (प्रतिनिधी)
इसिससाठी
खाल्ल्या गोळ्या
आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान अरिबने इसिसने आखलेल्या प्रत्यक्ष हल्ल्यात शस्त्र उचलले या हल्ल्यात तो सहभागी झाला. या काळात तो तीन वेळा जखमी झाला. दोन वेळा त्याने इसिससाठी शरीरावर गोळ््या झेलल्या. तर एकदा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला, असा दावा एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
जखमी झाल्यानंतर
सुचला शहाणपणा
इसिसकडे आकृष्ट होऊन अरीब दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला खरा, मात्र या लढाईत जखमी झाल्यानंतर त्याला आपले कुटुंबीय व आपल्या देशाची आठवण झाली. जखमी झाल्यानंतर त्याने भारतात परतण्यासाठी धडपड सुरू केली.