रिक्षाचालकांची मनमानी; इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार, प्रवाशांकडून उकळतात जास्त पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:27 AM2018-02-16T03:27:20+5:302018-02-16T03:27:36+5:30
साध्या मीटरमध्ये फेरफार करून भाडे वाढण्याच्या तक्रारी आल्यानंतर परिवहन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती केली होती. मात्र, आता इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार करत प्रवाशांची लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : साध्या मीटरमध्ये फेरफार करून भाडे वाढण्याच्या तक्रारी आल्यानंतर परिवहन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती केली होती. मात्र, आता इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार करत प्रवाशांची लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई शहरासह उपनगरात १००पेक्षा जास्त रिक्षा आणि सुमारे ५० टॅक्सींमधील इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार करत प्रवाशांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
जोगेश्वरी येथील सिव्हिल इंजिनीअर असलेल्या सचिन खेतले यांनी मंगळवारी रात्री ठाण्यातील कापूरबावडी येथून जोगेश्वरी येथील श्यामनगर येथे जाण्यासाठी रिक्षा केली. सामान्यपणे ठाणे ते कांजूरमार्ग या टप्प्यापर्यंत सुमारे १०० रुपये इतके भाडे होते. मात्र, या वेळी १४० रुपये झाल्यावर सचिनला संशय आला. या दरम्यान कापूरबावडी येथून रिक्षा जोगेश्वरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर रिक्षाचालक डाव्या हाताने हँडलखालील बटन प्रेस करतोय, असे त्याच्या लक्षात आले. सचिनने हटकले असता त्याने असमाधानकारक उत्तर दिले. श्यामनगरला पोहोचल्यावर मीटरवर ३६० रुपये भाडे दिसले. सामान्यपणे कापूरबावडी ते श्यामनगर टप्प्यात ३०० रुपये भाडे होते. याबाबत विचारल्यावर रिक्षाचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सचिनने स्वयंसेवी संस्थेत काम करणाºया शिवाजी खैरनारला फोन करत मेघवाडी पोलीस स्थानकाजवळ बोलवून घेतले. पोलिसांत तक्रार दाखल करू, असे सचिनने सांगितल्यावर रिक्षाचालकाने फेरफार केल्याचे कबूल केले. अशाप्रकारे मुंबई, उपनगरात १००पेक्षा जास्त रिक्षा धावत असल्याचे त्याने सांगितले.
‘कोणतीही कागदपत्रे नाहीत’ : या प्रकरणी जोगेश्वरी वाहतूक पोलिसांनी रिक्षा जप्त केली आहे. रिक्षाचालकाकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याची माहिती समोर आली आहे. चालकाकडील वाहन परवाना नवी मुंबई पोलिसांनी जप्त केल्यामुळे वर्षभरापासून सदर रिक्षाचालक परवानाच्या फोटोकॉपीवर रिक्षा चालवत आहे. वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी पत्रव्यवहार करून सदर रिक्षा अधिकृत आहे की नाही, याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती जोगेश्वरी पोलिसांनी दिली.
मीटरमध्ये बदलाची तक्रार
एमएच ०३-बीटी-६१६१ या रिक्षा चालकाविरोधात ‘मीटरमध्ये बदल करणे’ अशी तक्रार गुरुवारी नोंदवण्यात आली आहे. या रिक्षाचालकाला २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
- पुरूषोत्तम निकम,
वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालय
रिक्षामध्ये फेरफार झाल्याच्या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तक्रारदारानुसार संबंधित रिक्षावर कडक कारवाई करण्यात येईल. रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये अशा प्रकारे फेरफार रोखण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)ला वाहन तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- मनोज सौनिक, वाहतूक विभागाचे प्रधान
सचिव आणि परिवहन आयुक्त (अतिरिक्त भार)
तपासलेली
वाहने- ४५९१
दोषी वाहने- ७०४
अटकावून ठेवलेली वाहने- ५५
निकाली वाहने-६५०
वसूल दंड - २५,२८,४२०
अनुप्ती निलंबन- ६५०
परवाना निलंबन- ६५०
नोंदणी निलंबन -०