मैलाच्या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा
By admin | Published: April 30, 2017 04:39 AM2017-04-30T04:39:23+5:302017-04-30T04:39:23+5:30
मैला-मैलांचे अंतर सांगून इतिहासाची साक्ष देणारे ‘मैलाचे दगड’ काँक्रिटच्या जंगलात जमिनीखाली गाडले गेले आहेत. परिणामी मुंबईच्या विकासात ऐतिहासिक महत्त्व
मुंबई : मैला-मैलांचे अंतर सांगून इतिहासाची साक्ष देणारे ‘मैलाचे दगड’ काँक्रिटच्या जंगलात जमिनीखाली गाडले गेले आहेत. परिणामी मुंबईच्या विकासात ऐतिहासिक महत्त्व आणि संदर्भ असलेले हे दगड नष्ट होत आहेत. त्यामुळे या दगडांचे जतन करण्याची मागणी जोर धरत आहे. असा ठरावच मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आला आहे. त्यानुसार या मैलाच्या दगडांना लवकरच पुरातन वास्तूचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.
ब्रिटिश काळात अंतर मोजण्यासाठी पालिकेने रोवलेले दगड अजूनही अस्तित्वात आहेत. हे दगड काळबादेवी, लोअर परळ, दादर, भायखळा आणि माझगाव आदी भागांत जमिनीखाली आहेत. या दगडांवर असलेली माहिती ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मुंबईच्या विकासात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या दगडांचा वारसा नष्ट होत आहे. त्यामुळे या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा मिळावा, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.काही दिवसांपूर्वीच अतिक्रमणावर कारवाई दरम्यान महापालिकेच्या कामगारांना परळ येथील केईएम रुग्णालयामागे एस.एस. राव मार्गावरील पदपथावर ब्रिटिश काळातील मैलाच्या दगडाचा शोध लागला. त्या दगडावर रोमन अंकात पाच माइल्स असे लिहिले आहे. असे काही तुरळक मैलाचे दगड अद्यापही तग धरून आहेत. त्यांचा शोध लावून त्यांचे जतन करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
ब्रिटिशांच्या काळातील दगड
आज अर्धवट पुरलेल्या स्थितीत असणारे हे मैलाचे दगड तीन ते चार फूट उंचीचे आहेत. ब्रिटिश काळात असे दहाहून अधिक मैलाचे दगड कुलाबा ते दादर या शहर भागात बसवण्यात आले होते. ब्रिटिश काळातील हे दगड कालांतराने जमिनीखाली गाडले गेले. अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना अनेक वेळा अशा दगडांचा शोध लागला आहे.
सात ते आठ दगडांवर आता अतिक्रमणे झाली आहेत. महासभेच्या मंजुरीनंतर हा ठराव आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यास मैलाच्या दगडांचे जतन करण्यासाठी हालचाली सुरू होतील. १८१६ ते १८३७ या काळामध्ये हे दगड उभे करण्यात आले आहेत.
फोर्टमधील सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हा सुरुवातीचा बिंदू मानून त्यापासून मैलामध्ये अंतर मोजून हे दगड लावण्यात आले. सेंट थॉमस कॅथेड्रल हे दक्षिण मुंबईमधील महत्त्वाचे चर्च मानले जाई. हे चर्च आता तीनशेव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. याच चर्चच्या नावावरून चर्चगेट स्टेशनला नाव मिळाले. या परिसरामुळेच येथील रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे नाव देण्यात आले होते, नंतर त्याचे नाव वीर नरिमन असे करण्यात आले.