राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:35 AM2017-10-28T05:35:44+5:302017-10-28T05:35:47+5:30
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता.
मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी घेतला.
बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे नाव ‘भिवा’ असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर आजही बाल ‘भिवा’ची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.