Join us  

बीडीडीसाठी वास्तुविशारदांचे सादरीकरण

By admin | Published: January 05, 2016 2:44 AM

मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याचे तीन वास्तुविशारदांनी सोमवारी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांपुढे सादरीकरण केले.

मुंबई : मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास आराखड्याचे तीन वास्तुविशारदांनी सोमवारी गृहनिर्माण राज्यमंत्र्यांपुढे सादरीकरण केले. यावेळी राज्यमंत्र्यांनी बीडीडीचा पुनर्विकास आगामी चार वर्षांत मार्गी लावण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांना दिले आहेत. बीडीडी प्रकल्पाला चालना देण्यासाठी म्हाडाने मंगळवारी चाळींतील संघटना आणि राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे.बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाने वास्तुविशारदांकडून निविदा मागविल्या होत्या. या निविदांना २४ वास्तुविशारदांनी स्वारस्य दाखवले होते. छाननी प्रक्रियेनंतर २४ पैकी १३ वास्तुविशारदांची निवड म्हाडाने केली. यानंतर घेतलेल्या स्पर्धेत ११ वास्तुविशारदांनी म्हाडा कार्यालयात चाळींच्या प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण केले. म्हाडामार्फत हे आराखडे शासनाकडे पाठविण्यात येणार होते. त्यानुसार म्हाडाने सोमवारी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना प्रकल्पाचे सादरीकरण केले. या वेळी वायकर यांनी हा प्रकल्प पुढील चार वर्षांत मार्गी लावण्याचे आणि प्रकल्पातील रहिवाशांचे आहे त्याच ठिकाणी पुनवर्सन करण्याचे आदेश म्हाडाला दिले असल्याची, माहिती सूत्रांनी दिली.बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाने स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक रहिवासी संघटनांसोबत ५ जानेवारी रोजी वरळीतील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला संघटनेच्या दोन व्यक्तींनी उपस्थित राहावे, अशा सूचना म्हाडाने संघटनांना पत्राद्वारे दिल्या आहेत. बीडीडीतील झोपड्यांचाही पुनर्विकासात समावेश करावा, अशी मागणी येथील संघटनांकडून केली जात आहे. मात्र बैठकीला बोलाविले नसल्याबद्दल झोपडीधारकांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)