अर्चितने देशात पटकावला ५३वा क्रमांक

By admin | Published: June 15, 2017 03:43 AM2017-06-15T03:43:56+5:302017-06-15T03:43:56+5:30

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या निकालात मुंबईच्या अर्चित जैनने देशात ५३वा क्रमांक तर रिक्षाचालकाचा मुलगा नितीन दिवाकरने देशात ८८४वा क्रमांक पटकावून

Archit's 53rd place in the country | अर्चितने देशात पटकावला ५३वा क्रमांक

अर्चितने देशात पटकावला ५३वा क्रमांक

Next

- मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या निकालात मुंबईच्या अर्चित जैनने देशात ५३वा क्रमांक तर रिक्षाचालकाचा मुलगा नितीन दिवाकरने देशात ८८४वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. हे दोघेही राव आयआयटी अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी असून, या अ‍ॅकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत यश संपादन केले आहे.
यंदा जेईई परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त २.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राव अ‍ॅकॅडमीमधून परीक्षेसाठी ३ हजार २४० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४० टक्के म्हणजे १ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे राव आयआयटी अ‍ॅकॅडमीचे सीईओ विनय कुमार यांनी सांगितले.
देशात ५३वा आलेल्या अर्चित जैन याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माझ्या यशात या अ‍ॅकॅडमीचा सिंहाचा वाटा आहे. विनय कुमार आणि त्यांच्या पवई शाखेत शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापकांची अभ्यासात खूप मदत झाली. दर आठवड्याला होणाऱ्या चाचणी परीक्षा आणि कसून करून घेतलेला सराव यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तसेच माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेले कष्ट आणि वडिलांचे प्रोत्साहनदेखील महत्त्वाचे होते. मला आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घ्यायचे आहे. ‘मेक इन इंडिया’मुळे मी प्रभावित झालो असून, परदेशात न जाता मी भारतातच नोकरी करणार असल्याचे अर्चितने स्पष्ट केले. अर्चित ४० सेकंदांत क्यूब तयार करतो. तसेच त्याला फुटबॉल आणि बुद्धिबळाची आवड असल्याचे विनय कुमार यांनी सांगितले.
कांदिवली (पूर्व) हनुमान नगर येथील पठाण चाळीत छोट्याशा खोलीत राहणाऱ्या नितीन दिवाकरचे वडील रिक्षाचालक आहेत. विनय कुमार सर, त्यांची पत्नी आणि अ‍ॅकॅडमीच्या कार्यकारी संचालिका यामिनी राव, कांदिवली शाखेचे समन्वयक राहुल सिंग यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचे नितीनने स्पष्ट केले.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी शिकण्याची
जिद्द असल्यामुळे सलग तीन वर्षे अ‍ॅकॅडमीच्या वतीने मोफत शिक्षण देण्यात आले. त्याला अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून नितीनला खास पवई येथे स्वतंत्र निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे
नितीनचे वडील अनिल दिवाकर यांनी सांगितले.
मुंबई आयआयटीत मेकॅनिकल शाखेत मी प्रवेश घेणार असून, येथून पदवी घेतल्यावर देशाच्या संरक्षण खात्यासाठी अत्याधुनिक यंत्रे बनवण्याची इच्छा असल्याचे नितीनने सांगितले. माझ्या यशात माझी आई शकुंतला आणि रिक्षा चालवून घर चालवणारे माझे वडील अनिल यांचे मोलाचे योगदान असल्याचे नितीनने स्पष्ट केले.

देशात राव आयआयटी अ‍ॅकॅडमीच्या सुमारे ५० शाखा असून, ४०० तज्ज्ञ, अनुभवी प्राध्यापकांसह सुमारे १ हजार ५० जणांची टीम कार्यरत आहे. सर्वच विद्यार्थ्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करत असल्यामुळे गेल्या ५-६ वर्षांत आमचा यशाचा आलेख उंचावला आहे. यंदाच्या परीक्षेत देशातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये १३ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.
- विनय कुमार, सीईओ, राव आयआयटी अ‍ॅकॅडमी

Web Title: Archit's 53rd place in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.