मुंबई - हिंदुत्वाचा गाजावाजा करून सरकार स्थापन करणाऱ्या प्रशासनाने आरेत गणेश विसर्जन करण्यास बंदी आणली आहे. इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीने गेल्या सोमवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत आरे तलावाच्या बाहेर छोटा काश्मीर येथे कृत्रिम तलाव बनवण्यासाठी परवानगी दिली होती.मात्र आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे हे आपल्या पदाचा गैरवापर करून कोणतेही प्रशासकीय नियम पाळत नसून अजून पालिकेच्या पी दक्षिण विभागाला आरे तलावाच्या बाहेर कृत्रिम तलाव उभारण्यास त्यांनी एनओसी दिली नाही.परिणामी आज दीड दिवसाच्या घरगुती गणपती येथील गणेश भक्तांना अन्यत्र विसर्जनाला न्यावे लागले अशी माहिती आरे नागरी हक्क समितीचे सुनील कुमरे यांनी लोकमतला दिली.
यामुळे आरे परिसरातील कित्येक दिड दिवसच्या गणपती बाप्पाचा विसर्जन कुठे करायचे या काळजीत येथील गणेश भक्त आहेत. यामुळे आरेत धार्मिक समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने आरेच्या गोरेगाव चेक नाका येथे तसेच पालिकेच्या दिनकरराव देसाई मार्गावर पिकनिक पॉईंट येथे गाड्यांवर फिरते कृत्रिम तलाव केलेले आहे.या मार्गावर सिमेंट रोडचे काम सुरू आहे. रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे विसर्जना जाण्यासाठी गणेश भक्तांना मोठा त्रास होणार आहे. तरी आरे प्रशासनाने सनियंत्रण समिती दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महानगरपालिकेस कृत्रिम तलाव बांधण्याची परवानगी आरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
2022 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात भाजप विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी या आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भिवंडीतील मयत आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या जागेतील भ्रष्टाचार बाबत सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती.मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ते कोणालाच घाबरत नाही असा सणसणीत आरोप कुमरे यांनी केला.